06 July 2020

News Flash

स्व-समानुभूती

‘दुसऱ्याच्या बुटात पाय घाला आणि त्यांना काय वाटते हे बघा, हे समानुभूतीचे मर्म मला पटते आणि जमते. पण स्वत:च्या समानुभूतीचे काय? स्वत:कडेही तेवढेच लक्ष द्यायला

‘दुसऱ्याच्या बुटात पाय घाला आणि त्यांना काय वाटते हे बघा,
हे समानुभूतीचे मर्म मला पटते आणि जमते. पण स्वत:च्या समानुभूतीचे काय? स्वत:कडेही तेवढेच लक्ष द्यायला हवं. विमानात एक सूचना नेहमी देतात की विमानातील हवेचा दाब कमी झाला तर वरून मास्क खाली येतील. आधी स्वत:ला मास्क लावा, मग इतरांना मदत करा. मला ही जास्तीची कामं करायची असतील तर मला माझी काळजी घेणं आवश्यक आहे,’
हे स्व-समानुभूतीचं मर्मही केतकीला आता पटलं होतं.
केतकीची मावशी आणि तिची लेक मनवा, केतकीकडे राहायला आल्या होत्या. दोघीही चिपळूणच्या. मनवाला आठवा महिना लागला होता. बाळात कदाचित व्यंग असावं, असं तिकडच्या डॉक्टरांना वाटलं म्हणून मुंबईच्या मोठय़ा डॉक्टरांना दाखवण्याचा सल्ला त्यांनी दिला. केतकी मदत करणारी, समजूतदार शिवाय मावशीची लाडकी म्हणून मावशीनेच केतकीकडे यायचा सल्ला मनवाला दिला. सोबतीला मावशीही मनवाबरोबर आली. त्यांचं अर्थातच खूप प्रेमानं स्वागत झालं. अस्मिता आणि आदित्य म्हणालेसुद्धा, मनवाची लेकही आली असती तर मजा आली असती.

मनवाला बेडरेस्ट सांगितली असल्याने मावशीचा सगळा वेळ मनवाच्या वेळा पाळण्यात जात असे. आदित्य आणि अस्मिता दोघांचीही परीक्षा जवळ आल्याने ते कामात मदत करू शकत नव्हते. मकरंद तर ऑफिसच्या कामातच खूप व्यग्र होता. त्यामुळे केतकीवरचा कामाचा ताण वाढला होता. पण तरीही ती हसतखेळत सर्व काही करीत होती. मावशीही तिचे भरभरून कौतुक करायची. एक दिवस केतकीला ऑफिसमधून संगीत नाटकात काम करणार का, असं विचारण्यात आलं. आणि नाटक बसवायला थोडी मदत हवी आहे, असंही सांगण्यात आलं. तालमी सुरू व्हायला आठवडय़ाचा अवधी होता. केतकीने ‘हो’ म्हणून टाकलं. ती अगदी हरखून गेली होती. गाणं आणि नाटक म्हणजे तिचा जीव की प्राण. तिच्या डोक्यात नाटक घोळू लागलं. ‘‘कशा पद्धतीने त्यातील गीते गाता येतील, त्यातील ताना घेता येतील, वेशभूषेत काय काय करता येईल..’’ ती नाटकमय होऊन गेली होती. एके दिवशी त्याच तंद्रीत तिने घरात पाऊल टाकलं पण मावशीचा चेहरा बघून ती एकदम भानावर आली. तिचा चहा घेऊन झाल्यावर मावशी तिला म्हणाली, ‘‘तुला आम्ही नीटनेटकी समजायचो पण आता तुझं घरात दुर्लक्ष होत चाललं आहे. आज किचनमध्ये बघितलं तर तेलाच्या डब्यापाशी केवढं तेलकट आणि काळ झालं आहे. बाथरूमच्या दरवाजाच्या मागे जळमटं धरली आहेत. दिवाणखान्यात टेबलावर किती धूळ आहे.’’ केतकीला अगदी शरमल्यासारखं झालं. ‘‘खरंच असं कसं लक्ष नाही, आपलं घरात? उद्यापासून अजून लवकर उठून कामं केली पाहिजेत.’’ असा विचार करून ती लागलीच कामाला लागली.
दुसऱ्या दिवशी मनवाला घेऊन डॉक्टरांकडे जायचं होतं. म्हणून केतकीने अर्धा दिवसाची सुट्टी टाकली. आपणहून गाडी काढून मनवाला घेऊन गेली. डॉक्टरांनी बाळाचा ओठ दुभंगलेला आहे याची कल्पना दिली. पण बाकी बाळ एकदम व्यवस्थित असल्याचं सांगितलं. तरी मनवाच्या डोळ्यांतलं पाणी थांबेना. मकरंद आणि केतकीने तिला त्यांच्याकडेच राहण्याचा सल्ला दिला. इकडच्याच चांगल्या डॉक्टरांकडून बाळावर उपचार करू, असं सांगितलं. मावशीही मदतीला थांबेन, असं म्हणाली. ही गोष्ट मनवाच्या सासरी पटली. त्यांनी मनवाला केतकीकडे राहायची परवानगी दिली. पण मनवाला बाळ दूध कसं पिणार, ते कसं दिसेल? लोक काय म्हणतील? असे प्रश्न सतत पडत. तेव्हा केतकी तिला म्हणाली, ‘‘मनवा, तुझी काळजी कळते आहे. बाळाला दूध कसं पाजावं यासाठी खास तज्ज्ञ असतात त्यांचा आपण सल्ला घेऊ. तुझे बाळ अगदी सामान्य बाळासारखे दूध पिऊ शकेल. बाळाच्या ओठाची शस्त्रक्रिया झाली की मग काहीच प्रश्न नाही. आणि लोकांचा विचार तू का करतेस? ते असतातच बोलण्यासाठी. ते बिच्चारी म्हणून तुझी कीव करतील किंवा हिनेच काळजी घेतली नाही असेही म्हणतील. बाळ असं कसं? असंही म्हणतील किंवा अजून बरंच काही म्हणतील. पण यात खरंच काही तथ्य आहे का? तुझा नवरा म्हणालाच ना, ‘बाळ जसं आहे तसं आपलं आहे.’ किती बरोबर बोलला तो. आणि तुला दिसण्याचा प्रश्न कधीपासून भेडसवायला लागला? जेव्हा कोणी तुला बुटकं वांगं म्हणतं तेव्हा तू म्हणतेसच ना मला त्याचं काही वाटत नाही. बाकीच्यांचे बोल का लावून घ्या? मग, चल चिअर अप..’’ केतकी तिला सतत धीर द्यायची.

या सगळ्यामुळे केतकीवर कामाचा ताण वाढतच गेला. ऑफिसमध्येही तुम्ही कामं चोख करता असं म्हणत एक महत्त्वाचं काम तुम्ही कराल का, असं सरांनी विचारलं. सरांचा आपल्यावरील विश्वास बघून केतकीला बरं वाटलं. पण लागलीच तिच्या डोळ्यांसमोर घरची वाढलेली जबाबदारी उभी राहिली. परंतु तिला नकार देता आला नाही. आणि एक जास्तीचं काम अंगावर ओढवून घेतलं. त्यात नाटकाच्या तालमीही चालू झाल्या होत्या. तिचं काम खूप छान होत होतं. तीसुद्धा नाटकात मनापासून रस घेत होती, आनंद घेत होती पण त्यामुळे तिला घरी यायला उशीर व्हायला लागला.

एकदा घरी यायला खूप उशीर झाला. किचनमध्ये खूप पसारा झाला होता, त्यावरून मावशी चिडली होती. अस्मिताला कामं करायला शिकवलं नाहीस म्हणून बोल बोल बोलली. केतकीला कसंसच झालं. तिने न बोलता पटापट कामं आटपली. त्यावर मावशी म्हणालीही, ‘‘तुझ्या कामाचा झपाटा खूप आहे, पण आता या वयात नाटकात काम करायची काय गरज आहे? तुला त्रास होतोय तर त्यांना नाटकात काम करणार नाही असं सांगून टाक.’’ केतकीला हे अनपेक्षित होतं. आधीच ती दमली होती आणि हे ऐकून तिच्या डोळ्यांत पाणीच आलं. ती झोपायला म्हणून आत आली.

अंथरुणावर पडल्यावर डोक्यात विचारचक्र चालू झालं, ‘‘माझ्या डोळ्यांत पाणी का आलं? मी इतकी हळवी कशी झाले? अस्मिताला मी कोणती कामं करायला शिकवायची होती? घरातील प्रत्येक जण जसं जमेल तसं काम करतोच आहे. आता मुलांच्या परीक्षा आहेत. मकरंद तर लवकर जाऊन उशिरा घरी परत येतो. मग हे तिघे कशी काय मदत करणार?’’ असाच किती तरी वेळ ती विचार करत बसली आणि तिला काही गोष्टींचा उलगडा होत गेला.. ‘‘बऱ्याच वेळा समोरचा माणूस जे सांगतो मी नकळतपणे तसच करण्याचा, बनण्याचा प्रयत्न करते. बॉसने काम सांगितले, कामात तुम्ही चोख आहात म्हटल्यावर किंवा मावशी तू इतकी नेटनेटकी, असं म्हणाली म्हणून मी तसंच वागायचं प्रयत्न करते आहे. जणू काही कोणी तरी रिमोट दाबतं आणि मी त्याप्रमाणे काम करते. किंबहुना बऱ्याच वेळा माझी मीच माझ्यासमोर काठी धरून उभी राहते आणि हे काम चोख व्हायलाच हवं, घर स्वच्छ असायलाच हवं, अशी स्वत:लाच धमकावते आहे. मी असं का वागते आहे? मला समोरच्यानं चांगलंच म्हणावं, त्यांच्या नजरेतून मी उतरायला नको म्हणून की मला सुपर वुमन व्हायचं आहे? मी मनवाला समजावून घेते. तिच्या भावना समजावून घेते. तिला समजावते पण हेच करत असताना मी माझ्या भावनांकडे, कुचंबणेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते आहे. दुसऱ्याच्या बुटात पाय घाला आणि त्यांना काय वाटते हे बघा, हे एम्पथीचे, समानुभूतीचे मर्म मला पटते आणि जमते. पण स्वत:च्या समानुभूतीचे काय? स्वत:कडेही तेवढेच लक्ष द्यायला हवं. माझ्याही काही मर्यादा आहेत. त्या पलीकडे काम करणे शक्य नाही. मीही थकणार. माझ्याही काही आवडी आहेत. विमानात एक सूचना नेहमी देतात की विमानातील हवेचा दाब कमी झाला तर वरून मास्क खाली येतील. पण दुसऱ्याला मदत करायच्या आधी स्वत: मास्क लावा. तसेच मला ही जास्तीची कामं करायची असतील तर मला माझी काळजी घेणं आवश्यक आहे. मी नाटकातही काम करणार, कारण मला ते करायला खूप आवडतं. तो माझा विरंगुळा आहे. हा माझा आनंद मी माझ्यापासून हिरावून का घेऊ?’’

केतकीला स्वत:ची स्थिती लख्खपणे समोर दिसली. काही गोष्टी एकटीने सहन करण्याऐवजी त्यात इतरांनाही सहभागी करून घेणं गरजेचं आहे. आपली परिस्थिती जर समोरच्यांना समजत नसेल तर ती त्यांना सांगितली पाहिजे हे तिला जाणवलं. आपण सगळ्यांनी बोलूयाच, या निर्णयापाशी तिचं मन आलं आणि ती शांत झाली.

दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याच्या वेळी केतकीने सगळ्यांना एकत्र बसवलं आणि बदललेल्या परिस्थितीची जाणीव करून दिली. घरात प्रत्येकाला थोडी फार तडजोड करावी लागेल, घरात बाळ आल्यानंतर घरात टाइमटेबलप्रमाणे कामं होणं शक्य नाही, तसंच घरही लखलखीत राहणार नाही याची कल्पना दिली. त्याचबरोबर स्वत:च्या समाधानासाठी नाटकात काम करणार असल्याचंही तिनं सांगून टाकलं. त्याचा फायदा असा झाला की मनवाच्या सासरच्यांनी त्यांच्याकडे खूप वर्षांपासून असलेल्या मावशींना केतकीकडे मदतीसाठी पाठवून दिले. त्यामुळे केतकीचं कामंही सोपं झालं. आणि मनवाचं बाळंतपणही सुखरूप पार पडलं.

– माधवी गोखले
madhavigokhale66@gmail.com 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2016 1:03 am

Web Title: self caring first if want to do extra work
Next Stories
1 प्रतिक्रियेच्या उंबरठय़ावर
2 शक्यतांच्या उतारावर
3 एकाकीपणाकडून एकांताकडे
Just Now!
X