राजा विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. तलवार उपसून पुन्हा तो झाडावर चढला अन् फांदीवर लटकणाऱ्या प्रेताला खांद्यावर घेऊन मौनात चालू लागला. त्यासरशी प्रेतामधला वेताळ प्रश्न विचारू लागला. ‘‘राजा, तू एल अ‍ॅण्ड टी इन्फोटेक बाबतीत वर्तविलेले भविष्य खरे ठरले. गेल्या गुरुवारी एल अ‍ॅण्ड टी इन्फोटेक या कंपनीने स्वत:च्या समभागांची शेअर बाजारात नोंदणी करून उलाढालीला सुरुवात केल्यावर अधिक सोड परंतु खरेदी केलेल्या किंमतीइतका देखील भाव गुंतवणूकदारांना मिळाला नाही. ११ जुलैच्या लोकसत्ता अर्थ वृत्तांतमधून वैयक्तिक गुंतवणूकदारांना या विक्रीपासून दूर राहण्याचा तू सल्ला दिला होतास. हे तुला कसे कळले की या कंपनीने केलेल्या प्राथमिक विक्रीतून मिळालेले समभाग नफ्यात विकता येणार नाहीत. या प्रश्नाचे उत्तर तू सांगितले नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायावर लोळू लागतील.’ वेताळाने राजाला सांगितले.
‘‘तुला असा प्रश्न पडणे साहजिक आहे. जे कोणी शेअर बाजाराला सट्टा किंवा जुगार समजतात त्यांना दिलेले हे उत्तर आहे,’’ राजा म्हणाला.
‘‘कोणतीही एखादी कंपनी चांगली आहे हे सांगितले तरी त्या कंपनीचा समभाग रास्त भावात खरेदी करणे अतिशय महत्त्वाचे असते. इथे तर प्रत्यक्ष समूह अध्यक्षच या समभागाचे गुणगान करीत होते. एखाद्या कंपनीचा रास्त भाव किती यालाच समभाग विश्लेषण असे म्हणतात. हे विश्लेषण संख्यात्मक व गुणात्मक असते. संख्यात्मक विश्लेषणाला जितके महत्त्व आहे तितकेच महत्त्व गुणात्मक विश्लेषणाला आहे. जगातले सर्वकालीन सर्वश्रेष्ठ गुंतवणूकदार वॉरेन बफे यांचे उदाहरण देतो. मागील शतकाच्या अखेरच्या दशकात ‘अमेरिकन एक्स्प्रेस बँक’ या वित्तीय सेवा देणाऱ्या कंपनीचा भाव काही कारणांनी कोसळला. बफे यांनी या कंपनीचे समभाग मोठय़ा संख्येने खरेदी केले. त्या वर्षीच्या ‘लेटर टू शेअरहोल्डर्स’ अर्थात वार्षिक अहवालातून या कंपनीचे समभाग का विकत घेतले याचे त्यांनी विश्लेषणात्मक विवेचन केले. या कंपनीचा क्रेडिट कार्ड व्यवसाय, प्रवासाशी निगडित सेवा देणारा व्यवसाय यांचे मूल्यांकन तात्कालीन शेअर बाजारातील भावापेक्षा खूपच अधिक आहे असे बफे यांचे म्हणणे होते. या भावाला बफे हे ‘इंट्रेन्सिक व्हॅल्यू’ असे म्हणाले,’’ राजाने सांगितले.
‘‘गुंतवणुकीत ‘व्हॅल्यू’ व ‘प्राइस’ या दोन गोष्टींना फार महत्त्व आहे. सामान्य गुंतवणूकदारांना संगणकाच्या पडद्यावर लाल-निळ्या रंगात दिसते ती ‘प्राइस’ व ही ‘प्राइस’ देऊन जे विकत घेतले जाते ती ‘व्हॅल्यू’. आपल्या इकडचे उदाहरण द्यायचे तर फार दूर न जाता, जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात बँकांचे समभाग कोसळत असताना स्टेट बँकेचा पडद्यावर जो खरेदी-विक्रीचा भाव दिसत होता त्याला ‘प्राइस’ म्हणता येईल. यापलीकडे जाऊन विचार केल्यास ‘स्टेट बँक’ या नाममुद्रेचे वलय, रिझव्‍‌र्ह बँकेने बँकिंग व्यवसाय करण्यासाठी दिलेला परवाना यांचे मोल करणे कठीण आहे. मोठय़ा संख्येने असलेले बँकेचे प्रशिक्षित कर्मचारी, गावागावांत असलेल्या बँकांच्या शाखांची संख्या, पुनर्मूल्यांकन न केलेली बँकेची स्थावर मालमत्ता यांचा विचार केल्यास बँकेची ‘‘इंट्रेन्सिक व्हॅल्यू’ ही पडद्यावर दिसणाऱ्या भावापेक्षा खूपच अधिक होती. बँकेच्या मुंबईच्या फोर्ट भागातील इमारतीचे मूल्य हे बँकेच्या ताळेबंदात असलेल्या पुस्तकी किमतीपेक्षा कितीतरी अधिक आहे. बँकेचे हे अदृश्य मोल संगणकाच्या पडद्यावरील किमतीच्या पलीकडचे आहे. आज करोडो रुपये मोजण्यास तयार असूनही ४२ पैकी केवळ दोन अर्जदारांना बँकिंग व्यवसाय करण्याचा परवाना मिळाला. या बँकिंग परवान्याचे मोल कसे तोलणार,’’ राजाने विचारले.
‘‘जाणत्यांच्या हे लक्षात आल्याने बँकेच्या समभागांची मोठय़ा संख्येने खरेदी झाल्याने अर्थसंकल्पाच्या दिवशी म्हणजे २९ फेब्रुवारी रोजी १५०च्या आसपास रेंगाळणारा भाव सध्या २३० रुपयांवर पोहचला आहे. म्हणूनच एखादी गुंतवणूक करताना तो समभाग रास्त भावाला खरेदी करणे महत्त्वाचे असते,’’ राजा म्हणाला.
‘‘सामान्य गुंतवणूकदारांना रास्त भाव कसा कळेल?’’ वेताळाने राजाला विचारले.
‘‘एखाद्या समभागाचा रास्त भाव कळणे ही कला आहे, ही कला कष्टसाध्य आहे, परंतु असाध्य नक्कीच नाही. यासाठी तज्ज्ञांची मदत घेणे गरजेचे असते. वर्तमानपत्राचे वाचन, कंपन्यांचे तिमाही-सहामाही निकाल यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. ज्याला समभाग गुंतवणुकीत ‘टिप्स’ म्हणतात ते टाळायला हवे. थोडक्यात गुंतवणूक हा विषय गंभीरपणे घेणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त गुंतवणुकीची गुरुकिल्ली मिळविण्यासाठी काय करावे यापेक्षा काय करू नये याचीच यादी मोठी आहे,’’ राजा म्हणाला. अशा तऱ्हेने राजाचे मौन भंगल्यामुळे वेताळ शवासहित गायब झाला आणि झाडावर जाऊन बसला.
पुंगीवाला – gajrachipungi @gmail.com