मूळची चिनी कंपनी अलिबाबा ग्रुप होल्डिंग्ज पीटीई लि.च्या बहुप्रतिक्षित समभाग विक्रीचा तिचे संस्थापक जॅक मा (मध्यभागी) यांनी गुरुवारी अमेरिकेच्या न्यूयॉर्क शेअर बाजारात विधिवत घंटानाद केला. ई-व्यापार क्षेत्रातील जागतिक कंपनीने अपेक्षा केली जात होती त्यापेक्षा जास्त म्हणजे प्रत्येकी ६८ डॉलरने समभागांची विक्री आरंभली असून, या आधीच्या अमेरिकेतील सर्व भागविक्रीचे विक्रम ती मोडीत काढेल आणि संभाव्य १६८ अब्ज डॉलर अशा बाजारमूल्यासह जगातील ४० सूचिबद्ध महाकंपन्यांच्या पंक्तीत तिला नेऊन बसवेल. तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठी भागविक्री म्हणून २०१२ सालातील फेसबुकच्या भागविक्रीकडे पाहिले जाते. परंतु अलिबाबाबद्दल आताशी दिसणारी उत्सुकता पाहता ही कंपनी त्याहून खूप अधिक म्हणजे २४.३ अब्ज डॉलरची माया गुंतवणूकदारांकडून गोळा करेल, असे अंदाजले जात आहे.