04 August 2020

News Flash

बाजार-साप्ताहिकी : चढती कमान

मार्च महिन्यात पानिपत झालेल्या बाजारात एप्रिल महिन्यात १४ टक्यांची वाढ होऊन गेल्या ११ वर्षांतील विक्रम मोडला.

संग्रहित छायाचित्र

* सुधीर जोशी

या सप्ताहातील चारच दिवसांच्या कारभारात जागतिक बाजारांच्या पावलावर पाऊल टाकत प्रत्येक दिवशी बाजाराच्या निर्देशांकांनी वरची पातळी गाठली. रेमडेसिव्हिर औषधाच्या यशाबाबतचे अमेरिकन आरोग्य अधिकाऱ्यांचे वक्तव्य, केंद्र सरकारकडून उद्योगांना मिळू शकणाऱ्या आर्थिक सहकार्याबद्दलच्या आशा, ३ मेनंतर अनेक ठिकाणी टाळेबंदी उठण्याची शक्यता यामुळे गुंतवणूकदारांचे मनोबल उंचावले. मार्च महिन्यात पानिपत झालेल्या बाजारात एप्रिल महिन्यात १४ टक्यांची वाढ होऊन गेल्या ११ वर्षांतील विक्रम मोडला.

खनिज तेलाच्या घसरणाऱ्या किंमतींमुळे रिलायन्सच्या नफ्यातील कमतरता काही अंशी जिओ व रिटेल उद्योगांनी भरून काढली. फेसबुकने केलेल्या गुंतवणुकीमुळे व भविष्यात हक्क तत्वाने होणाऱ्या समभाग विक्रीमुळे रिलायन्स इंडस्ट्रीजची कर्जमुक्तीकडे वाटचाल होईल. दूरसंचार क्षेत्रातील सामर्थ्यांच्या जोरावर भारतातील लहान मोठय़ा किराणा दुकानदारांना आपल्या साखळीत समाविष्ट करण्याची योजना रिटेल उद्योगामधे क्रांतीकारी ठरेल. त्यामुळे कंपनीमधील गुंतवणूकदारांना पूर्वीचे सुगीचे दिवस येतील.

इंडसइंड बँकेच्या चौथ्या तिमाही निकालांमुळे गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला. मागील वर्षी १,८०० च्या घरात असणारे बँकेच्या समभागाचे मूल्य गेल्या महिन्यात ३०० च्या घरात आले होते. त्यामुळे याही बँकेची अवस्था येस बँकेप्रमाणे होणार, अशी भीती व्यक्त होत होती. परिणामी बँकेच्या ठेवीदेखील कमी होऊ लागल्या होत्या.

नवीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नेमणूक व कंपनीच्या नफ्यामधील केवळ १६ टक्क्य़ांच्या घसरणीने गुंतवणूकदारांना खाली गेलेल्या बाजार मुल्यात संधी वाटून कंपनीच्या समभागात १५ टक्यांची वाढ झाली.

केईसी इंटरनॅशनल हादेखील असाच ५० टक्यांनी घसरलेला समभाग आहे. कंपनीचा मेक्सिको व ब्राझीलमधील कारभार त्या देशांमधील अत्यावश्यक सेवांमध्ये मोडत असल्यामुळे सुरळीत चालू आहे. भारतातील कामकाज सुरू करण्यास अंशत: परवानगी मिळाली आहे. कंपनीच्या हातातील मागण्या पाहाता सध्याच्या बाजारमुल्यात यामधील गुंतवणूक फायद्याची ठरू शकते.

अ‍ॅक्सिस बँकेने शेवटच्या तिमाहीत जाहीर केलेला तोटा हा कोरोनामुळे होणाऱ्या संभाव्य बुडीत कर्जाबाबत केलेल्या ३,००० कोटींच्या तरतुदीमुळे आहे. कर्ज वाटप व ठेवींबाबतची कामगिरी समाधानकारक आहे तसेच गेल्या वर्षी उभारलेल्या १२,५०० पाचशे कोटींच्या भांडवलामुळे भांडवल क्षमता चांगली आहे. बँकेचे समभाग खालच्या पातळीवर घेण्यासारखे आहेत.

हिंदुस्तान युनिलिव्हरच्या शेवटच्या तिमाहीत उत्पन्न व नफ्यात घट झाली. कारण करोनामुळे मार्च महिन्यात विक्रीवर परिणाम झाला. टाळेबंदीमुळे पुढील तीन महिन्यातील निकालावर  वितरण व्यवस्थेतील मर्यादा, उत्पादन बंद ठेवण्याचा परिणाम दिसेल. परंतु यामुळे समभागातील संभाव्य घसरणीमध्ये गुंतवणुकीची संधी साधता येईल.

बाजार नेहमी भविष्याविमुख असल्यामुळे पुढे येणाऱ्या संकटाचे वा समृध्दीचे प्रतिबिंब त्यात अगोदरच दिसू लागते. उद्योगधंदे नव्या समीकरणांशी जुळवून घेतील असा बाजाराला आशावाद आहे.

परंतु सर्व काही आलबेल होण्यास अजून बराच कालावधी जावा लागेल. मोठय़ा पडझडीनंतर येणारी पहिली तेजी अल्पकाळाची असणे हा इतिहास आहे. मासिक सौदापूर्तीच्या या सप्ताहात शेवटच्या दिवसाची तेजी ‘शॉर्ट कव्हरिंग’मुळे आली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत खरेदीची संधी नक्कीच येईल.

* sudhirjoshi23@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2020 12:23 am

Web Title: article on market indices reached higher levels abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 खात्रीशीर वस्तू पुरवठा, घाऊक किमतीत!
2 वाढता वाढता वाढे… जिओचा नफा २ हजार ३३१ कोटींवर
3 ७५ अब्ज डॉलर्सचा O2C व्यवसाय वेगळा करण्याचा RIL चा निर्णय
Just Now!
X