मुंबई : भांडवली बाजाराच्या आठवडय़ातील अखेरच्या दिवसाचे व्यवहार आटोपल्यावर सात वर्षांच्या तळातील विकास दराची निराशाजनक आकडेवारी आली. तथापि बँक सुधारणांचा नवा टप्पाही सरकारकडून जाहीर झाला. या संबंधाने आशादायी अपेक्षेने गुंतवणूकदारांनी समभाग खरेदीचे धोरण अनुसरल्याने प्रमुख निर्देशांक जवळपास पाऊण टक्के उसळीसह पुढे सरकले.

शुक्रवारच्या सत्रातील मुसंडीसह, सेन्सेक्ससह निफ्टीची दोन महिन्यांपूर्वीच्या केंद्रीय अर्थसंकल्पानंतरची सर्वोत्तम साप्ताहिक कामगिरी ठरली. मुंबई निर्देशांक गुरुवारच्या तुलनेत २६३.८६ अंश वाढीने ३७,३३२.७९ वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक ७४.९५ अंश वाढीसह ११,०२३.२५ पर्यंत स्थिरावला. साप्ताहिक तुलनेत सेन्सेक्समध्ये ६३१.६३ अंश तर निफ्टीत १९३.९० अंश भर पडली. टक्केवारीत हे प्रमाण अनुक्रमे प्रत्येकी १.७२ टक्के व १.७९ टक्के असे आहे.

मंदावलेल्या अर्थव्यवस्थेत उभारी आणण्यासाठी केंद्र सरकारकडून अधिक पावले उचलली जाणे गुंतवणूकदारांसाठी उत्साहदायी ठरले आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारात प्रति पिंप ६० डॉलपर्यंत उतरणाऱ्या खनिज तेल व डॉलरच्या तुलनेत ७१  वर उंचावणाऱ्या रुपयाची भर पडली.

भांडवली बाजारातील व्यवहार संपल्यानंतर चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीतील ५ टक्के विकास दराचा संथ प्रवास स्पष्ट झाला. त्याचबरोबर एकत्रीकरण होऊ घातलेल्या सरकारी बँकांच्या नवीन जोडय़ा शुक्रवारीच, व्यवहार सत्र संपुष्टात आल्यानंतर  अर्थमंत्र्यांकडून जाहीर झाल्या.

भांडवली बाजारात एकूणच उत्साहाचे वातावरण होते. किरकोळ गुंतवणूकदारांच्या पसंतीच्या बीएसई मिड कॅप व स्मॉल कॅप निर्देशांकांनीही  घसरणीतून अखेर उसंत घेतली.

प्रमुख निर्देशांक वाढ होऊनही सेन्सेक्समधील पॉवरग्रिड, ओएनजीसी, एचसीएल टेक, कोटक महिंद्र बँक, लार्सन अँड टुब्रो, एनटीपीसी, स्टेट बँक, एशियन पेंट्स मात्र २ टक्क्यांपर्यंत खाली आले.