देशाच्या बँकिंग क्षेत्रासमोरील आव्हान लक्षात घेता, त्याच्या मुकाबल्यासाठी सेवा व कारभारात आवश्यक बदलासंबंधी सल्लामसलत आणि नवकल्पनांना वाव देणाऱ्या कार्यशाळा राज्यात कार्यरत विविध आघाडीच्या राष्ट्रीयीकृत बँकांतर्फे सध्या सुरू आहेत. आजवर सिंडिकेट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक आणि युनियन बँक ऑफ इंडियाकडून अशा कार्यशाळा सरलेल्या दिवसांमध्ये पार पडल्या आहेत.

केंद्रीय अर्थव्यवहार मंत्रालयाच्या दिशानिर्देशानुरूप, देशातील सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांच्या व्यवस्थापनाने अशा पद्धतीने सर्व शाखांमधील कर्मचाऱ्यांबरोबर सखोल चिंतन व चर्चेचे आयोजन करण्यात येत आहे. त्यातून पुढे येणाऱ्या कल्पना आणि निरीक्षणे अर्थमंत्रालयाला कळविली जाणार आहेत.

बँक ऑफ महाराष्ट्रच्या मुंबई प्रादेशिक कार्यालयात झालेल्या सभेत व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एस. राजीव यांच्या उपस्थितीत शाखा व्यवस्थापकांसह विचारविमर्श केला गेला. विचारविमर्श मोहिमेचा हा पहिला टप्पा असून ज्यात मुंबई परिक्षेत्रातील शाखांना स्वत:च्या कार्याचे पुनरावलोकन आणि भविष्यातील रणनीती आणि पुढील मार्ग निश्चित करण्यास सांगितले जाणार आहे.

युनियन बँक ऑफ इंडियाच्या पुणे क्षेत्रीय कार्यालयाद्वारे आयोजित सर्व शाखाधिकाऱ्यांच्या सभेत, राष्ट्रीय प्राथमिकतेबरोबरच, बँकिंग क्षेत्राला जोडण्यासाठी एकत्रित सल्लामसलतीची प्रक्रिया पार पडली. ग्राहकांशी सौहार्दपूर्ण व्यवहार ठेवून, बँकेची डिजिटल उत्पादने वापरण्यासाठी लोकांना उद्युक्त करण्याबद्दल या निमित्ताने विचारमंथन झाले.

सिंडिकेट बँकेच्या मुंबई क्षेत्रीय विभागाचे महाव्यवस्थापक डी. पलनिसामी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पथदर्शक कार्यशाळेत ग्राहककेंद्रित उद्दिष्टांशी जुळवून घेत व त्यांना पूर्णत: साहाय्यभूत ठरतील अशा कार्यक्रमांची व योजनांची आखणी करण्यात आली. बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक ए. के. दास यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्ह्य़ात अशा सल्लामसलत सभेचे आयोजन करण्यात आले. विशिष्ट नियोजन करण्याच्या हेतूने या चर्चेदरम्यान अनेक विषयांवर ऊहापोह करण्यात आला, जसे डिजिटल पेमेंट्स, सरकारी बँकांतील कॉर्पोरेट गव्हर्नन्स, रिटेल, शेती, एमएसएमईंसाठी कर्जे, एक्स्पोर्ट क्रेडिट, पाच लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी वित्तीय ग्रिड निर्माण करणे या उद्दिष्टांवर दास यांनी भर दिला.

इंडियन ओव्हरसीज बँकेच्या पुणे क्षेत्रीय कार्यालयाद्वारे आयोजित सर्व शाखा पातळीवरील पहिल्या सल्लागार बैठकीत, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, लघुउद्योजक, तरुण विद्यार्थी व स्त्रिया यांना अधिक सक्षम करण्यासाठी तसेच त्यांच्या आकांक्षापूर्तीसाठी बँकिंग सेवा कार्यक्षम बनविण्यासाठी विचारमंथन झाले.

या सल्लामसलतीमुळे शाखा पातळीवर कर्मचाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असल्याचे बँकांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.