भांडवली बाजारात निर्देशांक तेजी सलग पाचव्या व्यवहारात कायम राहिली. मात्र सप्ताहअखेरचे व्यवहार पार पाडताना गुंतवणूकदारांकडून समभागांवर दबाव जाणवला. परिणामी प्रमुख निर्देशांक गेल्या काही सत्रांच्या तुलनेत शुक्रवारी कमी वाढ नोंदविणारे ठरले.

माफक २३.८९ अंश वाढीसह मुंबई निर्देशांक ३६,१९४.३० पर्यंत पोहोचला. तर १८.०५ अंश वाढीमुळे राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीला १०,८७६.७५ पर्यंत स्थिरावता आले. सप्ताहात सेन्सेक्स १,२१३.२८ ने वाढला आहे, तर निफ्टीतील या दरम्यानची वाढ ३५० अंशांची राहिली आहे.

सायंकाळी जाहीर होणाऱ्या चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीतील सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या आकडेवारीबाबत सावधता व्यक्त करत गुंतवणूकदारांनी सप्ताहअखेरचे व्यवहार केले. परिणामी भक्कम रुपया आणि स्थिरावणाऱ्या खनिज तेलाच्या किमती याचा फार सकारात्मक परिणाम दिसला नाही.

जी२० राष्ट्रांची तसेच प्रमुख तेल उत्पादक देशांच्या बैठकीवर भांडवली बाजार येत्या आठवडय़ात प्रतिक्रिया देण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर  रिझव्‍‌र्ह बँकेचीही बैठक होत आहे.

शुक्रवारी सेन्सेक्समध्ये विप्रो, येस बँक, कोटक महिंद्र बँक, महिंद्र अँड महिंद्र, सन फार्मा, मारुती सुझुकी, एचडीएफसी लिमिटेड, हीरो मोटोकॉर्प, इन्फोसिस, टीसीएस, लार्सन अँड टुब्रो, बजाज ऑटो, हिंदुस्थान यूनिलिव्हर आदी ६ टक्क्यांच्या वाढीसह अग्रणी राहिले. तर टाटा मोटर्स, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, वेदांता, एनटीपीसी, भारती एअरटेल, कोल इंडिया, अदानी पोर्ट्स, टाटा स्टील, अ‍ॅक्सिस बँक, पॉवरग्रिड, स्टेट बँक यांचे मूल्य ३ टक्क्यांपर्यंत खाली आले. स्थावर मालमत्ता, औषधनिर्माण, माहिती तंत्रज्ञान आदी २ टक्क्यांपर्यंत वाढले, तर पोलाद, बँक निर्देशांकांवर जवळपास अर्ध्या टक्क्यापर्यंतच्या घसरणीचा दबाव राहिला.