सर्वोच्च स्तराला पोहोचलेल्या सेन्सेक्सची नफेखोरी लुटण्यासाठी नव्या संवताचा पहिला दिवस कामी आला. तब्बल २६५ अंश घसरण नोंदवत मुंबई निर्देशांक मंगळवारी २१ हजाराच्याही खाली आला. सलग तीन दिवस ऐतिहासिक उच्चांकाची हॅट्ट्रिक करणाऱ्या सेन्सेक्सने पाच व्यवहारातील तेजी मोडून काढणाऱ्या प्रमुख भांडवली बाजारात गुंतवणूकदारांनी वधारलेल्या भावांवर समभाग विकले.
खऱ्या अर्थाने संवत २०७० चा व्यवहारातील पहिला दिवस मंगळवार होता. सेन्सेक्स पहिल्या तीन दिवसांप्रमाणेच रविवारी मुहूर्ताच्या व्यवहारालाही २१,२३९.३६ अशा सर्वोच्च टप्प्यावर होता. मंगळवारी पहिल्या पाच दिवसातील तेजी नेस्तनाबूत होताना सेन्सेक्स सव्वा टक्क्य़ांनी खालावला. २१ हजाराच्या आत २०, ९७४ वर तो स्थिरावला. तर ३० सप्टेंबरनंतरची त्याची ही सर्वात मोठी आपटी ठरली. त्यावेळी मुंबई निर्देशांक एकाच व्यवहारात ३४७.५० ने आपटला होता.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ६४.२० अंश नुकसानासह ६,३०० ची पातळी सोडत ६,२५३.१५ वर बंद झाला. सर्वोच्च टप्प्याला हुलकावणी देणाऱ्या निफ्टीने रविवारी लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्ताला ६,३१७.३५ गाठत विक्रमी स्तर गाठला होता.
मुंबई शेअर बाजारात आज आयटीसी, आयसीआयसीआय बँक, टीसीएस अशा समभागांच्या मूल्यांमध्ये घट नोंदली गेली. सेन्सेक्समधील ३० पैकी २२ समभाग घसरले. त्यातही आरोग्यनिगा, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांना सर्वाधिक फटका बसला.
सेन्सेक्समधील घसरणीच्या इतर समभागांमध्ये बजाज ऑटो, भारती एअरटेल, भेल, गेल इंडिया, हिंदुस्थान यूनिलिव्हर, इन्फोसिस, जिंदाल स्टील आणि लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो यांचा समावेश राहिला. तर आरोग्यनिगा व माहिती तंत्रज्ञान निर्देशांक अनुक्रमे १.५५ व १.२८ टक्क्य़ांनी घसरला.
सलग पाच दिवसातील तेजी मंगळवारच्या मोठय़ा घसरणीने थोपविली गेली असतानाच महिन्यातील एकाच व्यवहारातील सर्वात मोठी आपटी सेन्सेक्सने नोंदविली. वरच्या टप्प्यावर पोहोचलेले कंपनी समभाग मूल्य नफेखोरीत परावर्तित करत गुंतवणूकदारांनी आघाडीच्या समभागांची जोरदार विक्री केली.
गेल्या आठवडय़ातील पाचही व्यवहारात सेन्सेक्सने तब्बल ६६९ अंश भर नोंदविली होती. जागतिक स्तरावर शेअर बाजारात सावधानता बाळगली जात असताना येथील गुंतवणूकदारांनी मात्र फायदा उठवत समभागांची विक्री केल्याचे मानले जाते.
डॉलरच्या तुलनेत रुपया भक्कम
तब्बल तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर रुपया डॉलरच्या तुलनेत मंगळवारी १२ पैशांनी भक्कम बनला. चलनाला आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी ६१.६१ असा भाव मिळाला. परकी चलन व्यवहारात रुपया ६१.९४ या दिवसाच्या नीचांकाला पोहोचला होता. त्याचा दिवसाचा बंद व्यवहार हाच सत्राचा उच्चांक ठरला. ऑक्टोबरच्या अखेरसह नोव्हेंबरची सुरुवातही भारतीय चलनाने घसरणीने केली होती. गुरुवारी रुपया डॉलरच्या तुलनेत २७ पैशांनी घसरल्यानंतर शुक्रवारी पुन्हा तो २४ पैशांनी अधिक कमकुवत बनला. तत्पूर्वी चलनात सलग दोन व्यवहारात भर पडली.
सराफा बाजारात व्यवहार बंदच
दिपावलीनिमित्त मुंबई शहरातील सराफा बाजारातील दर मंगळवारी स्थिरच होते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी स्टॅण्डर्ड सोने १० गॅ्रॅमसाठी अवघ्या ३० रुपयांनी उंचावले होते. तर किलोच्या चांदीचा दर मात्र १३० रुपयांनी कमी झाला होता. त्यामुळे मौल्यवान धातूंचे दर शहरात अनुक्रमे ३०,४०० व ४९,६६५ रुपये होते. सराफा बाजारातील दरांमध्ये आगामी नजीकच्या कालावधीत फार मोठी वाढ पहायला मिळणार नाही, असा अंदाज आहे. दसरा – दिवाळीसारख्या सणांमध्येही सोने तोळ्यासाठी ३० हजार तर चांदी किलोमागे ५० हजाराच्याच घरात राहिली आहे.