भांडवली बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांनी नव्या सप्ताहाची सुरुवात संमिश्र हालचालींनी केली. सोमवारअखेर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स किरकोळ वाढला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी जवळपास त्याच प्रमाणात, मात्र घसरला.

आठवडय़ाच्या पहिल्या व्यवहारा दरम्यान ४१,०९३.९९ पर्यंत झेप घेणारा मुंबई निर्देशांक सत्रात ४०,७०७.६३ पर्यंत घसरलाही. मात्र शुक्रवारच्या तुलनेत सेन्सेक्स अवघ्या ८.३६ अंश वाढीसह ४०,८०२.१७ पर्यंतच स्थिरावू शकला. तुलनेत ७.८५ अंश घसरणीसह निफ्टी १२.०४८.२० वर जाऊ शकला.

गेल्या आठवडय़ात तीन सत्रात सेन्सेक्स तसेच निफ्टीने विक्रमी टप्पे गाठले होते. नव्या आठवडय़ाची भांडवली बाजाराची सुरुवात तेजीसह झाली. मात्र व्यवहारात गुंतवणूकदारांच्या नफेखोरीचा दबाव राहिला. परिणामी प्रमुख निर्देशांक मोठय़ा अंशप्रमाणात फार हालचाल नोंदवू शकले नाहीत.

गेल्या सप्ताहात जाहीर झालेल्या सहा वर्षांच्या तळातील सकल राष्ट्रीय उत्पादनाची चिंता तसेच चालू आठवडाअखेरपूर्वी जाहीर होणाऱ्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या व्याजदर बदलाच्या पतधोरणाबाबतची अनिश्चितता सोमवारच्या व्यवहारात भांडवली बाजारात उमटली.

संमिश्र भांडवली बाजारात दूरसंचार तसेच वाहन क्षेत्रातील समभागांची मूल्यहालचाल लक्षणीय राहिली. दूरसंचार समभाग वाढले. हा क्षेत्रीय निर्देशांकही २.६४ टक्केवाढीसह प्रमुख १९ निर्देशांकांमध्ये अग्रणी राहिला. तर घसरलेल्या १५ क्षेत्रीय समभागांमध्ये बँक तसेच वाहन क्षेत्रातील समभाग घसरले.