वायू वितरण क्षेत्रातील सार्वजनिक कंपनी गेल इंडियाचे राज्यातील दाभोळ (रत्नागिरी) येथील वार्षिक ५० लाख टन क्षमतेचे एलएनजी टर्मिनल अस्तित्वात आले असून २०१७ पर्यंत त्याची निर्मितीक्षमता दुप्पट होणार आहे. सुरुवातीला ७५ लाख आणि नंतर १०० टनपर्यत होणाऱ्या या निर्मितीक्षमतेसाठी कंपनीला २५ लाख टनामागे १,००० कोटी रुपये खर्च येणार आहे.
पश्चिम तसेच दक्षिण भारताला वायू पुरवठा करू शकणारे दाभोळ हे महत्त्वाचे केंद्र ठरेल. गेल आणि एनटीपीसी या प्रमुख भागधारकांची कंपनी असलेल्या रत्नागिरी गॅसमार्फत हे टर्मिनल चालविण्यात येत आहे. दाभोळ-उरण वाहिनीमार्फत महाराष्ट्रात वायू पुरवठा होणार आहे. कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बी. सी. त्रिपाठी यांनी मुंबईपासून ३४० किलोमीटरवर असणारे हे टर्मिनल अस्तित्वात आल्याची माहिती देतानाच दोन वर्षांत त्याची निर्मिती क्षमता ७५ लाख टन होईल, असेही सांगितले.