देश विदेशातील ५० टक्के उद्योजकांनी राज्यात आर्थिक गुंतवणूक केली आहे. महाराष्ट्र हे उद्योग अग्रणी राज्य असून इस्त्रायलच्या उद्योगपतींनी येथे उद्योग सुरु करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी येथे केले. ताज हॉटलेमध्ये आयोजित ‘भारत इस्त्रायल उद्योग संमेलना’ प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेत्यान्याहू उपस्थित होते.

महाराष्ट्रात उद्योग वाढीस पोषक वातावरण आहे. आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. देशातील अन्य राज्यांपेक्षा सर्वात मोठी ५० टक्के आर्थिक गुंतवणूक या राज्यात झाली आहे. इस्त्रायलच्या उद्योजकांसाठी गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ आणि संधी आहे. त्यामुळे त्यांनी राज्यात गुंतवणूक करण्यास पुढे यावे असे आवाहनही त्यांनी केले.

इस्रायलने भारतासोबत नऊ  सामंजस्य करार केले आहेत. त्यात सायबर सुरक्षा, तेल आणि वायू, सौर-औष्णिक ऊर्जा, अवकाश तंत्रज्ञान, पाण्याचे नियोजन, विमान वाहतूक, आरोग्य सुविधा, चित्रपट निर्मिती, कृषी तंत्रज्ञान आणि संरक्षण सामग्री विषयक कराराचा समावेश आहे.

 

सुसूत्र कररचनेद्वारे अर्थउभारी शक्य!; इस्रायली पंतप्रधानांचे प्रतिपादन

मुंबई : अर्थव्यवस्थेच्या वाढीमध्ये खासगी क्षेत्राचा सिंहाचा वाटा असून किमान आणि सुसूत्र कररचनेद्वारे कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था उभारी घेऊ शकते, असे प्रतिपादन इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गुरुवारी मुंबईत केले.

वस्तू व सेवा करप्रणालीत सातत्याने होत असलेले बदल व मंदावलेला भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग या पाश्र्वभूमीवर नेतान्याहू यांनी गुरुवारी भारतीय उद्योजकांसमोर मांडलेल्या विचारांना वेगळा अर्थ प्राप्त झाला आहे.

अतिरिक्त नियम हे स्पर्धेकरिता मारक असतात असे स्पष्ट करत नेतान्याहू यांनी खासगी उद्योगाला प्रोत्साहन देत अर्थव्यवस्था वाढीला चालना देण्याची गरज या वेळी मांडली. नावीन्यतेचे महत्त्व विशद करत नेतान्याहू यांनी या वेळी उद्योजकांना व्यवसायाकरिता ती अनिवार्य बाब असल्याचे नमूद केले. नावीन्यावर लक्ष केंद्रित करून भारतानेही तमाम जगाला आपल्याकडे आकर्षित करावे, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

भारताच्या दौऱ्यावर असलेल्या इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गुरुवारी मुंबई भेटीदरम्यान उद्योगपतींशी चर्चा केली. भारत-इस्रायल व्यवसाय परिषदेच्या निमित्ताने या वेळी गोदरेज समूहाचे अध्यक्ष अदि गोदरेज, कोटक महिंद्र बँकेचे उपाध्यक्ष उदय कोटक, बजाज समूहाचे राहुल बजाज, पिरामल एंटरप्राईजेसचे अजय पिरामल, आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर, हर्ष गोएंका, महिंद्र समूहाचे आनंद महिंद्रा, दिलीप संघवी, अशोक हिंदुजा, अतुल पुंज आदी या वेळी उपस्थित होते.

नेतान्याहू यांच्याबरोबर या वेळी विविध उद्योग क्षेत्रातील १३० सदस्यीय व्यवसाय शिष्टमंडळ होते. भारत आणि इस्रायल दरम्यान २०१६-१७ मध्ये ५ अब्ज डॉलरच्या व्यवसायाची देवाण- घेवाण झाली आहे.