23 November 2017

News Flash

‘समूह विकासा’तून स्वावलंबन साधणे शक्य!

लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये रोजगारनिर्मितीची मोठी क्षमता आहे.

प्रतिनिधी, मुंबई | Updated: September 13, 2017 2:42 AM

लघुउद्योग विषयावरील दुसऱ्या दिवसाच्या चर्चासत्रा दरम्यान मंचावर डॉ. प्रदीप बावडेकर, समीर जोशी व संजय सेठी.

प्रोत्साहनपूरक योजना व उद्योगानुकूलता

मोठय़ा प्रमाणावर रोजगार निर्मिती करणाऱ्या लघुउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी निरनिराळ्या योजनांच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकार मदतीचा हात देत आहे. एकसारखा उद्योग करणाऱ्या उद्योजकांनी एकत्र येऊन समूह विकास योजनेसारखा सरकारने चांगला पुढाकार घेतला आहे. त्याचा जास्तीत जास्त लाभ घेऊन लघुउद्योगांना स्वावलंबन शक्य असल्याचे मत ‘प्रोत्साहनपूरक योजना व उद्योगानुकूलता’ या विषयावरील परिसंवादात व्यक्त करण्यात आली.

लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये रोजगारनिर्मितीची मोठी क्षमता आहे, परंतु या उद्योगांना प्रोत्साहनाची नितांत आवश्यकता आहे. या उद्योजकांनीही संशोधन आणि विकासावर भर देण्याची, कौशल्य विकासावर भर देण्याची गरज आहे, असा सूर तज्ज्ञांनी व्यक्त केला. निधीबरोबरच भूखंड आणि अन्य पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. मात्र या उद्योजकांनी संघटित होण्याची नितांत आवश्यकता आहे.  त्यासाठी सर्वप्रथम या उद्योजकांनी संघटित व्हायला हवे. एकसमान उद्योग करणाऱ्या उद्योजकांनी परस्परांमधील व्यावसायिक वैर विसरून समूह विकासाला चालना देण्याची वेळ आली आहे. त्यातूनच लघु आणि मध्यम उद्योगांना चालना मिळू शकेल आणि अधिकाधिक रोजगारनिर्मितीही होऊ शकेल, असा विश्वास तज्ज्ञांनी या वेळी व्यक्त केला.

राज्यातील सुमारे ६० टक्के लोकसंख्या ही सूक्ष्म, मध्यम आणि लघुउद्योग क्षेत्रावर आर्थिकदृष्टय़ा अवलंबून आहे. इतकी मोठी व्याप्ती असलेल्या क्षेत्रातील बहुतांश उद्योजकांना मात्र त्यांच्यासाठी असलेल्या सुविधा, योजना या संलग्न वेबस्थळावर केवळ इंग्रजीत उपलब्ध आहेत. उद्योगासाठी आवश्यक असणारे मार्गदर्शन, माहिती व अनुभवांची देवाणघेवाण यासाठी राज्यस्तरावर एक व्यासपीठ सरकारच्या माध्यमातून उभारणे गरजेचे आहे. कौशल्य विकासासाठी दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाचा दर्जा सुधारणेही आवश्यक आहे.

समीर जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी, कोहिनूर टेक्निकल इन्स्टिटय़ूट

एका उत्पादनाशी संलग्न असणाऱ्या उद्योजकांनी एकमेकांची निंदा करण्यामध्ये आपला वेळ न दवडता एकत्र येऊन राज्य आणि केंद्र सरकारच्या समूह विकास योजनेचा लाभ घ्यावा. या योजनेंतर्गत उद्योजकांना मोठय़ा प्रमाणात आर्थिक मदत मिळवून उद्योगाचा पाया भक्कम करणे शक्य आहे. तसेच उद्योगासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, उद्योगाच्या विस्तारासाठी आवश्यक मार्गदर्शन हे समूह म्हणून एकत्रितपणे सरकारदरबारी मांडल्यावर त्याची आवर्जून दखल घेतली जाते.  बंधुभाव हे एक तत्त्व बाळगून पुढे येणाऱ्या उद्योजकांना भविष्यात नक्कीच यशस्वी उद्योजक म्हणून नावलौकिक मिळवता येऊ शकतो.

डॉ. प्रदीप बावडेकर, व्यवस्थापकीय संचालक, मिटकॉन

गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये लघुउद्योगांना प्रोत्साहन देण्यात येत असून रोजगारनिर्मितीमध्ये सूक्ष्म आणि लघुउद्योगांचा वाटा मोठा आहे. असे असले तरी या असंघटित उद्योगांमुळे किती रोजगारनिर्मिती होते हे सांगणे अवघड आहे. यापूर्वी सरकारकडून लघुउद्योगांना भांडवली अनुदानाच्या रूपात मदत करण्यात येत होती, परंतु केवळ पैसे दिल्यानंतर हे उद्योग उभे राहू शकत नाहीत. कौशल्य विकास आदी विविध बाबींवरही लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. त्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.

संजय सेठी, मुख्य कार्यकारी अधिकारी, एमआयडीसी

First Published on September 13, 2017 2:42 am

Web Title: group development employment generation small business