उद्योग क्षेत्रासाठी विजेचे जादा दर व शेतकऱ्यांची वीज जोडणी तोडण्यात येत असल्यामुळे निर्माण झालेल्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मंत्रिगटाची स्थापना करण्यात आली असून त्या माध्यमातून योग्य तो तोडगा काढण्यात येईल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पिंपरीत पत्रकारांना सांगितले. दिल्ली-मुंबईचा कॉरिडॉर पुण्यापर्यंत कसा आणता येईल, याचा प्रयत्न सुरू असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
‘इंडिया ट्रेड प्रोमोशन ऑर्गनायझेशन’ व ‘ऑटो क्लस्टर डेव्हलपमेंट अँड रीसर्च सेंटर’ यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड येथे आयोजित ‘अ‍ॅटो अ‍ॅनसिलरी शो २०१३’ चे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. पिंपरीच्या महापौर मोहिनी लांडे, पालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी, जिल्हाधिकारी विकास देशमुख, आयटीपीओचे व्यवस्थापकीय संचालक रीटा मेनन, कार्यकारी संचालक मलाय श्रीवास्तव, उद्योग विभागाच्या विकास आयुक्त राधिका दस्तोगी आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, वीजदराचा प्रश्न गंभीर आहे. शेतकऱ्यांना १० हजार कोटींची सबसिडी दिली जाते. त्यातील सात हजार कोटीचा बोजा उद्योगावर पडतो. वीजदराच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मंत्रिगटामार्फत तोडगा काढण्यात येईल. शेतकऱ्यांची वीज तोडू नये, अशी आपली भूमिका असली तरी प्रत्येकाने वीजबिले भरली पाहिजेत. शासनाने उद्योगवाढीसाठी उद्योग धोरण राबवले आहे, त्यानुसार विविध सवलती दिल्या आहेत, लघुउद्योजकांना प्रोत्साहन दिले आहे. नव्या भूसंपादन धोरणास मान्यता दिली आहे. १९९१ नंतर शासकीय नोकऱ्या बंद झाल्या असून खासगी उद्योग व मोठय़ा कंपन्या ह्य़ाच उद्योगनिर्मितीचे केंद्र बनले आहे. त्यामुळे खासगी क्षेत्रास सहकार्य करण्याचे शासनाचे धोरण राहणार आहे. आता व्यापार बदलला असून उद्योगांमध्ये वृद्धी आली आहे.  ब्रँडला महत्त्व आले आहे. िपपरी, चाकण, रांजणगाव हा औद्योगिक पट्टा मोठय़ा प्रमाणावर विकसित होत असून तिथे चांगल्या सुविधा दिल्या जात आहे.
मोशीतील औद्योगिक प्रदर्शन केंद्रास ‘आयटीपीओ’ तसेच केंद्राने सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. चाकणच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाची जागा निश्चित झाली असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

अनियमित बांधकामप्रकरणी मौन
पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची घोषणा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी या विषयावरील प्रश्नांची उत्तरे देण्यास असमर्थता दर्शवली. ते काही विचारू नका, असे ते म्हणाले. मंदीच्या व अन्य कारणांमुळे शहरातील कंपन्यांचे स्थलांतर अन्य राज्यात होत असल्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली. पिंपरी-चिंचवड हे उद्योगांना चालना देणारे शहर आहे. मोशीतील औद्योगिक प्रदर्शन केंद्र सुरू झाल्यानंतर बाहेरील उद्योग शहरात येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.