शनिवारी ठाण्यात ‘लोकसत्ता-विश्लेषण’ कार्यक्रमातून मार्गदर्शन

जनसामान्यांच्या आयुष्य आणि कुटुंबाचे अंदाजपत्रक घडविणे आणि बिघडविण्यात केंद्रीय अर्थसंकल्पाचा थेट संबंध असतो. अर्थसंकल्पाचा सामान्य करदाता, पगारदार वर्ग खरेच किती लाभार्थी असतो आणि अर्थसंकल्पातून त्याच्या जीवनमानावर कोणता परिणाम संभवेल, याचे येत्या शनिवारी म्हणजे संसदेत अर्थसंकल्प मांडला जाईल त्याच संध्याकाळी ‘लोकसत्ता विश्लेषण’ कार्यक्रमातून सविस्तर विवेचन केले जाणार आहे.

टिप-टॉप प्लाझा, एल. बी. एस. मार्ग, रहेजा गार्डनसमोर, ठाणे (प.) येथे १ फेब्रुवारीला सायंकाळी ६.०० वाजता हा ‘लोकसत्ता-विश्लेषण’ कार्यक्रम योजण्यात आला आहे. ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर आणि प्रसिद्ध कर-सल्लागार दीपक टिकेकर हे या कार्यक्रमात मार्गदर्शन करतील.

येत्या काळात देशाचा विकास कोणत्या दिशेने होऊ घातला आहे, याचे दिशादर्शन अर्थसंकल्पातून केले जात असते. अर्थसंकल्पातून घेतला गेलेला भविष्यवेध आणि तरतुदी या वास्तववादी की अतिरंजित याचे विश्लेषण यानिमित्ताने केले जाईल. विशेषत: मंदावलेला अर्थवृद्धिदर ताळ्यावर येण्यासाठी, परिणामी सर्वसामान्यांच्या गुंतवणूक आणि बचतीला चालना देऊन त्यांच्या अर्थसिद्धीच्या दिशेने संकल्पाचा ऊहापोह केला जाईल.

कार्यक्रमाला प्रवेश खुला व विनामूल्य असून, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल. यानिमित्ताने प्रेक्षकांना त्यांच्या नेमक्या प्रश्न व शंकांचीही उत्तरे वक्त्यांकडून दिली जातील.