भांडवली बाजारातील मुख्य निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी यांनी करोनाकाळात भयानकता पूर्णपणे मागे सारून, टाळेबंदीपूर्व सहा महिन्यांच्या उच्चांकांच्या दिशेने आगेकूच कायम राखली आहे. सप्ताहारंभीच्या या व्यवहारात निर्देशांकांच्या मुसंडीला चलन बाजारात रुपयाच्या मूल्यात प्रति डॉलर ५२ पैशांच्या भरारीनेही उत्साही साथ दिली.

बँका आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील समभागांमध्ये झालेल्या उत्सवी खरेदीने, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक – सेन्सेक्सने ३६४.३६ अंशांच्या वाढीतून सोमवारच्या व्यवहाराअंती ३८,७९९.०८ ही पातळी गाठली. बरोबरीने एनएसई-निफ्टी निर्देशांकाने ९४.८५ अंशांची भर घालून दिवसअखेर ११,४६६.४५ या पातळीवर विश्राम घेतला. दोन्ही निर्देशांकांना टाळेबंदीपूर्व काळात म्हणजे फेब्रुवारीअखेर दाखविलेल्या उच्चांकी पातळ्यांना पुन्हा गवसणी घातली आहे.

सेन्सेक्समधील ३० समभागांमध्ये कोटक बँक सर्वाधिक ३.५३ टक्के वाढीसह अग्रणी राहिला. खालोखाल इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, बजाज फिनसव्‍‌र्ह, स्टेट बँक, एचडीएफसी असे बँका व वित्तीय कंपन्यांच्या समभागांना खरेदीचे पाठबळ मिळून त्यांचे भाव वधारताना दिसले.

अमेरिकेच्या औषध नियामकांनी करोना रुग्णांच्या उपचारासाठी रक्तद्रव उपचार पद्धतीला अनुमती दिल्याचा या आजारसाथीवर वेगाने नियंत्रणासाठी मदत मिळेल, या भावनेने जगातील प्रमुख भांडवली बाजारात सकारात्मक वातावरण होते.

तर नोव्हेंबरमधील राष्ट्राध्यक्ष निवडणुकांआधी ब्रिटनकडून विकसित लसीचा प्रयोग अमेरिकेतील रुग्णांवर करू देणारा नियमातील शिथिलतेचाही ट्रम्प प्रशासन विचार करीत आहे, याचाही पाश्चिमात्य बाजारांवर सुपरिणाम दिसून आला.

जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे उधळलेल्या स्थानिक भांडवली बाजारातील मुख्य निर्देशांकांच्या बरोबरीने, बीएसई मिड-कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकातील जवळपास दीड टक्क्यांची दमदार झेप सोमवारी बाजारातील खरेदीचे वातावरण सर्वव्यापी असल्याचा प्रत्यय देणारे आहे.

‘एलआयसी’ भागविक्रीसाठी सल्लागार नियुक्त 

मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात ‘एलआयसी’च्या प्राथमिक समभाग विक्रीद्वारे र्निगुतवणूक करण्यासाठी विक्रीपूर्व सल्लागार म्हणून एसबीआय कॅप्स आणि डेलॉइट यांच्या नेमणुकीस सरकारने हिरवा कंदील दिला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी फेब्रुवारीत मांडलेल्या अर्थसंकल्पात प्राथमिक भागविक्रीद्वारे एलआयसीमधील सरकारी भागभांडवलाची अंशत: विक्री करण्याची घोषणा केली होती. देशाच्या आयुर्विमा व्यवसायात ७५ टक्क्यांदरम्यान हिस्सा असलेल्या एलआयसीची मालमत्ता ३१ लाख कोटी रुपयांच्या घरात असून, ती सध्या १०० टक्के सरकारी मालकीची कंपनी आहे.

डॉलरमागे रुपयाची ५२ पैशांची मूल्यवाढ

मुंबई : भांडवली बाजारातील तेजीच्या वातावरणाचा सोमवारी चलन बाजारात रुपयाच्या विनिमय मूल्यात दमदार वाढीला हातभार लागला. समभाग खरेदीसाठी विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून डॉलरची मागणी वाढल्याच्या परिणामी रुपयाचे मूल्य ५२ पैशांनी वधारून ते प्रति डॉलर ७४.३२ वर गेले. गेल्या दीड महिन्यात रुपयाच्या मूल्याने एका सत्रात साधलेली ही सर्वोत्तम वाढ आहे.

सोमवारी आंतरबँक चलन व्यवहारांना रुपयाच्या डॉलरमागे ७४.९१ पातळीवरून सुरुवात झाली होती. ७४.३१ अशा उच्चांकापर्यंत ते झेपावल्यानंतर, दिवसअखेर ७४.३२ या पातळीवर हे व्यवहार थंडावले. रुपयाच्या मूल्याने टाळेबंदीपूर्व पातळीवर फेर धरला असून, १८ मार्च २०२० रोजी नोंदविलेली ७४.२६ ही रुपयाची गत पाच महिन्यांतील सर्वोच्च पातळी आहे.

विदेशी गुंतवणूकदार संस्थांची भारतात समभाग खरेदीसाठी निरंतर ओघ सुरू असून, त्याचा रुपयाच्या मूल्यात मजबुतीसाठी फायदा होत आहे. भांडवली बाजारात निर्देशांकांत तेजीचे उधाण हे मुख्यत: विदेशातून होत असलेल्या संस्थात्मक गुंतवणुकीच्या परिणामी असून, गेले काही दिवस सातत्याने सरासरी १,००० कोटी रुपयांच्या मूल्यांची समभाग खरेदी त्यांच्याकडून होत असल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे चलनविषयक वरिष्ठ संशोधन विश्लेषक जतीन त्रिवेदी यांनी सांगितले. जागतिक बाजारात अतिरिक्त रोकडसुलभता आहे आणि त्या परिणामी ऑगस्ट महिन्यात सरलेल्या शुक्रवापर्यंत विदेशी वित्तसंस्थांकडून ४१,३३० कोटी रुपयांचा भारतातील बाजारात गुंतवणूक ओघ दिसून आला.