‘आयआरबी इनव्हिट’ची गुरुवारी सूचिबद्घता

पायाभूत क्षेत्रासाठी भांडवली स्रोत खुला करून देणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट ‘इनव्हिट’अंतर्गत इंडिया ग्रिड ट्रस्टची प्रारंभिक खुली विक्री बुधवारपासून सुरू होत आहे. वीज पारेषणाचे जाळे असलेल्या इंडिया ग्रिड ट्रस्ट या विक्रीतून २,२५० कोटी रुपये उभारू पाहत आहे. या धाटणीचा पायाभूत क्षेत्रातील हा देशातील दुसरा इनव्हिट फंड आहे.

पायाभूत क्षेत्राला अर्थपुरवठय़ाच्या उद्देशाने २०१५ च्या अर्थसंकल्पातून इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट – इनव्हिट स्थापण्यास सरकारने परवानगी दिली. सेबी व अन्य नियंत्रकांच्या मान्यतेअभावी व या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या उत्पनाबाबत करविषयक स्पष्टतेच्या अभावी ही संकल्पना अस्तित्वात येण्यास दोन वर्षांचा कालावधी लागला. इनव्हिट स्थापण्यास सेबीने मान्यता देताना, या फंडाच्या युनिट्सच्या लाभावर आणि भांडवली नफ्यावरील कर आकारणी म्युच्युअल फंडातील रोखे गुंतवणुकीप्रमाणे करण्यात येईल ही स्पष्टता आली. त्यानंतर दोन आठवडय़ांपूर्वी देशातील पहिल्या इनव्हिटच्या युनिट्सची विक्री पथकर व्यवस्थापन आणि रस्ते बांधणी क्षेत्रात असलेल्या आयआरबीने केली. आयआरबी इनव्हिटच्या युनिट्सची सूचिबद्धता शेअर बाजारात गुरुवारीच होणार असून, त्याच वेळी इंडिया ग्रिड ट्रस्ट या दुसऱ्या इनव्हिटची प्रारंभिक विक्री (शुक्रवापर्यंत) सुरू असेल.

इंडिया ग्रिड ट्रस्टने त्यांच्या युनिट्सच्या प्रारंभिक विक्रीसाठी  ९८ ते १०० रुपये असा किंमत पट्टा ठरविला आहे. या विक्रीत किमान अर्ज १०,२५६ युनिट्ससाठी सादर करावयाचा असून त्यापुढे ५,१०३ युनिट्सच्या पटीत खरेदीसाठी गुंतवणूकदारांना अर्ज सादर करता येईल. एडेलवाईज, मॉर्गन स्टॅन्ले इडिया व सिटी बँक हे या विक्री प्रक्रियेचे व्यवस्थापक म्हणून काम पाहणार आहेत.

विजेच्या पारेषणातील स्टरलाइट पॉवर ग्रिड व्हेंचर्सने प्रवर्तीत केलेल्या इंडिया ग्रिड ट्रस्ट इनव्हिटच्या युनिट्सची बाजारात विक्री होत असून, स्टरलाइट इन्व्हेस्टमेंट मॅनेजर ही कंपनी या निधीचे व्यवस्थापन पाहणार आहे. विक्रीपश्चात फंडाचे युनिट्स मुंबई व राष्ट्रीय शेयर बाजारात सूचिबद्ध करण्यात येणार आहेत.

स्टरलाइट पॉवर ग्रिड व्हेंचर्सने वीज पारेषणाचे जाळे उभारले असून आंतरराज्य विजेच्या पारेषणाव्यतिरिक्त विजेच्या युनिट्सचा व्यापार, वीजसंग्रह, पारेषण यासाठी आवश्यक असलेल्या सुविधांचा विकास व अर्थपुरवठा व्यवसायात ती कार्यरत आहे. या व्यवसायातील उत्सर्जित मालमत्तांच्या उत्पन्नाचा न्यास स्थापला असून हा न्यासाने मालमत्ता व्यवस्थापन कंपनीची स्थापन केली आहे. अ‍ॅक्सिस ट्रस्टी सव्‍‌र्हिसेस लिमिटेडची इंडिया ग्रिड ट्रस्टसाठी विश्वस्त म्हणून कायम नेमणूक केली गेली आहे. या युनिट्स विक्रीतून उभ्या राहणाऱ्या निधीचा विनियोग भोपाळ-धुळे ट्रान्समिशन कंपनी लि. आणि जबलपूर ट्रान्समिशन कंपनी लि. अशा दोन चालू स्थितीतील व नफाक्षम वीज पारेषण प्रकल्पांच्या आणि दोन वीज उपकेंद्रांच्या संपादनासाठी केला जाणार आहे.

पहिल्या इनव्हिटच्या सूचिबद्धतेबाबत उत्सुकता

देशातील पहिल्या इनव्हिट अर्थात इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट असलेल्या आयआरबी इनव्हिटच्या युनिट्सची सूचिबद्धता शेअर बाजारात गुरुवारीच होणार आहे. प्रत्येकी १०० ते १०२ रुपये किंमत पट्टय़ाने युनिट्स विकून ५,०३५ कोटी रुपये उभारू पाहणाऱ्या आयआरबी इन्व्हिटच्या प्रारंभिक विक्रीने ५ मे २०१७ रोजी संपूर्ण भरणा केला. म्युच्युअल फंडाच्या डेट योजनांतून सरासरी ७ ते १० टक्के परतावा मिळत असताना, या इनव्हिटच्या गुंतवणुकीतून सरासरी १२ टक्के दराने वार्षिक परताव्याची ग्वाही आयआरबीने दिली आहे. त्यामुळे बडय़ा गुंतवणूकदार आणि म्युच्युअल फंडांची या सूचिबद्धतेबद्दल उत्सुकता आहेच, शिवाय, भांडवलाची आबाळ असलेल्या पायाभूत क्षेत्रासाठी निधीच्या या नवस्रोताच्या विश्वासार्हतेलाही यातून अधोरेखित केले जाणार आहे.