केकेआरची पंधरवडय़ात दुसरी गुंतवणूक
देशाच्या स्थावर मालमत्तेतील आर्थिक मरगळ दूर सारण्यासाठी पुढे येणाऱ्या निधी पुरवठादारांचा वेग वाढत आहे. केकेआर समूहाने गेल्या पंधरवडय़ात दुसरी मोठी गुंतवणूक या क्षेत्रात करतानाच लोढा समूहाच्या मुंबईतील गृहनिर्माण प्रकल्पात पिरामलने तब्बल ४२५ कोटी रुपयांचे गुंतविले आहेत.
लोढा समूहाच्या मध्य मुंबईतील एका गृहनिर्माण प्रकल्पात पिरामल फंड मॅनेजमेंटने ४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक जाहीर केली आहे. लोढा समूहाची उपकंपनी असलेल्या लोढा डेव्हलपर्समार्फत सध्या विकास होत असलेल्या ५ लाख चौरस फूट जागेकरिता ही गुंतवणूक होत आहे. लोढा समूह सध्या विकसित करीत असलेल्या या जागेपैकी ४० टक्के जागेची विक्री झाली आहे.
पिरामल फंड मॅनेजमेंटचे व्यवस्थापकीय संचालक खुशरु जिजिना व लोढाचे व्यवस्थापकीय संचालक अभिषेक लोढा यांनी संयुक्तरित्या याबाबतची घोषणा मुंबईत सोमवारी केली. मुंबईस्थित लोढा समूहाने गेल्या आर्थिक वर्षांत ८,००० कोटी रुपयाची विक्री नोंद केली आहे. तर आरोग्यनिगा, वित्तीय सेवा आदी क्षेत्रातील पिरामल एंटरप्राईजेसने गेल्या आर्थिक वर्षांत एक अब्ज डॉलरचा महसूल प्राप्त केला आहे.
केकेआर समूहाने मंत्री डेव्हलपर्सच्या बंगळुरुतील प्रकल्पात १४५ कोटी रुपये गुंतविण्याचे सोमवारी जाहीर केले. मंत्री विकासक कंपनीमार्फत दक्षिणेत आरामदायी प्रकल्प साकारत आहे. निवासी प्रकारातील हा प्रकल्प १३ लाख चौरस फूट जागेत असेल.
केकेआर ही जागतिक स्तरावरील गुंतवणूक, निधी व्यवस्थापन पाहणारी कंपनी असून तिची ही गेल्या पंधरवडय़ातील दुसरी मोठी या क्षेत्रातील गुंतवणूक आहे.
केकेआर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय नायर व मंत्री डेव्हलपर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुनील मंत्री यांच्या उपस्थितीत याबाबतच्या करारावर सोमवारी स्वाक्षरी झाली. १९९९ ची स्थापना असलेल्या मंत्री कंपनीमार्फत २८ प्रकल्प साकारण्यात आले असून कंपनीचे आतापर्यंत १.८ लाख चौरस फूटचा विकास करण्यात आला आहे. तर २.३ लाख कोटी चौरस फूट जागेत काम सुरू आहे.
जागतिक भाग भांडवल उभारणीतील केकेआरमार्फत स्थावर मालमत्ता क्षेत्रातील आघाडीच्या पुराणिक बिल्डर्सला गेल्याच आठवडय़ात ३०० कोटी रुपयांचे सहकार्य मिळाले होते. पुराणिक बिल्डर्सतर्फे पुण्यात अ‍ॅबितांते व एल्डेआ एस्पॅनोला हे दोन निवासी प्रकल्प साकारण्यात येणार असून हे प्रकल्प बाणेर तसेच बावधन येथे आहेत.