‘एल अँड टी’कडून कॉफी डे, सिद्धार्थ यांच्या हिश्शाची खरेदी

नवी दिल्ली : माहिती तंत्रज्ञान कंपनी माइंडट्रीवर ताब्यासाठी सशक्त पाऊल म्हणून लार्सन अँड टुब्रोने बाजारात घाऊक समभाग खरेदीद्वारे व्ही. जी. सिद्धार्थ आणि कॉफी डे ट्रेडिंग लिमिटेडकडील माइंडट्रीमधील जवळपास २० टक्के भागभांडवली हिस्सा संपादित केला आहे.

देशातील आघाडीच्या अभियांत्रिकी व पायाभूत समूह- लार्सन अँड टुब्रोद्वारे सिद्धार्थ यांच्याकडील हिस्सा खरेदी करण्याच्या भूमिकेबद्दल माइंडट्रीच्या प्रवर्तकांनी यापूर्वी नाराजी व्यक्त केली आहे. मंगळवारच्या मुंबई शेअर बाजार अर्थात बीएसईवरील व्यवहाराच्या उपलब्ध तपशिलानुसार, सिद्धार्थ आणि कॉफी डेच्या ताब्यातील ३.२७ कोटी समभागांची लार्सन अँड टुब्रोने घाऊक खरेदी केल्याचे स्पष्ट होते. माइंडट्रीमधील हा एकूण २०.३२ टक्के भागभांडवली हिस्सा होतो आणि त्याचे एकूण मूल्य ३,२१० कोटी रुपये असे आहे. याशिवाय आणखी १५ टक्के हिस्सा म्हणजे साधारण २,५०० कोटी रुपये मूल्याच्या समभागांची खुल्या बाजारातून खरेदी करण्यासाठी दलालांकडे लार्सन अँड टुब्रोने मागणी नोंद केली असल्याचेही समजते.

खुला प्रस्ताव तसेच भांडवली बाजारातील समभाग खरेदीद्वारे माइंडट्रीमधील एकूण ६६ टक्के भांडवली हिस्सा १०,८०० कोटी रुपये मोजून संपादित करण्याचा एल अँड टीचा मानस आहे. त्यासाठी तिने नव्याने ३१ टक्के हिश्शासाठी ५,०३० कोटी मोजण्याचे आणि विद्यमान भागधारकांपुढे खुला प्रस्ताव (ओपन ऑफर) ठेवण्याचे नियोजन आखले आहे.

तथापि, एल अँड टीच्या मनसुब्यांविरुद्ध माइंडट्रीच्या सह-संस्थापकांनी कंबर कसली असून, आपल्या सर्व संस्थात्मक गुंतवणूकदार, ग्राहक आणि कर्मचाऱ्यांना या प्रकरणी सहकार्य देण्याचे आवाहन पत्राद्वारे केले आहे. एल अँड टीच्या उद्यम कारभार आणि कार्यसंस्कृतीत खूप मोठे अंतर असून, हा जबरीने होणारा संपादन व्यवहार निष्फळ केला जावा, असे हे आवाहन आहे. त्याचप्रमाणे एल अँड टीचे हे अधिग्रहणाचे प्रयत्न आणि खुल्या प्रस्तावासंदर्भात योग्य त्या उत्तरासाठी माइंडट्रीने स्वतंत्र संचालकांची समितीही स्थापित केली आहे.