भांडवली बाजाराचे प्रमुख निर्देशांक शुक्रवारी जागतिक निर्देशांकांना साथ देताना घसरणीसह बंद झाले. मात्र सेन्सेक्स व निफ्टीने सप्ताह तुलनेत निर्देशांकवाढीची कामगिरी बजावली.

सत्रात ३७,७८७.३८ पर्यंत घसरणारा मुंबई निर्देशांक दिवसअखेर गुरुवारच्या तुलनेत १५.१२ अंशांनी खाली येत ३८,०४०.५७ वर स्थिरावला. तर १३.९० अंश घसरणीसह राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ११,२१४.०५ पर्यंत थांबला.

देशात करोनाबाधितांची संख्या २० लाखांच्या वर पोहोचल्याबाबतची चिंता भांडवली बाजारात व्यवहारादरम्यान उमटली.

सेन्सेक्समध्ये एशियन पेंट्स सर्वाधिक, ४.४४ टक्क्यांसह वाढला. त्याचबरोबर बजाज फायनान्स, इंडसइंड बँक, बजाज फिनसव्‍‌र्ह, मारुती सुझुकी वाढले. तर टायटन कं पनी, एचसीएल टेक, इन्फोसिस, महिंद्र अँड महिंद्र, सन फार्मा २.६५ टक्क्यांपर्यंत घसरले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये ऊर्जा, दूरसंचार, बहुपयोगी वस्तू आदी वाढले. ग्राहकोपयोगी वस्तू, माहिती तंत्रज्ञान, आरोग्यनिगा निर्देशांक घसरले. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅ प व स्मॉल कॅ प जवळपास प्रत्येकी दीड टक्क्यापर्यंत वाढले.

प्रमुख निर्देशांकांनी चालू सप्ताहात मात्र तेजीची नोंद के ली. या सप्ताहात सेन्सेक्स ४३३.६८ अंश तर निफ्टी १४०.६० अंशांनी वाढला.