जवळपास सात दशकांपासून सुरू असलेल्या उद्योग घराण्यांमधील संबंधांना पूर्णविराम देण्याची तयारी पूर्णत्वाला गेली आहे. टाटा सन्सपासून फारकतीकरिता सायरस मिस्त्री यांच्या शापूरजी पालनजी समूहाने विभाजनाचा प्रस्ताव तयार केला असून, तो सर्वोच्च न्यायालयाला सादरही करण्यात आल्याचे गुरुवारी सांगण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रस्तावाबाबत माहिती देताना शापूरजी पालनजी समूहाने, टाटा सन्सपासून विलग होताना टाटा समूहातील उपकंपन्यांचे समभाग पदरात पाडून घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यामुळे टाटा सन्समधील भांडवली बाजारात सूचिबद्ध कंपन्यांवरील ताण कमी होईल; तसेच त्यावरील टाटा समूहाचे नियंत्रणही कायम राखले जाईल.

टाटा समूहातील शतकाहून अधिक कंपन्यांचे पालकत्व असणाऱ्या टाटा सन्समध्ये १८.३७ टक्के भागभांडवली हिस्सा शापूरजी पालनजी समूहाकडे असून, त्याचे मूल्यांकन १.७५ लाख कोटी रुपये इतके आहे, असे या समूहाचा दावा आहे. टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून मिस्त्री यांना ऑक्टोबर २०१६ मध्ये काढून टाकण्यात आल्यानंतर टाटा सन्सबरोबरची गेल्या सात दशकांपासून सुरू असलेल्या संबंधांत कटुता आली आणि आता ते पूर्णपणे संपुष्टात आणण्याचा निर्णय शापूरजी पालनजी समूहाचे अध्यक्ष या नात्याने सायरस मिस्त्री यांनी घेतला आहे.

मिस्त्री यांचा प्रस्ताव मान्य झाल्यास, टाटा सन्सकडे ७२ टक्के हिस्सा असलेल्या टीसीएसमध्ये शापूरजी पालनजी समूहाला १३.२२ टक्के भांडवली हिस्सा मिळेल आणि त्याचे मूल्यांकन १.३५ लाख कोटी रुपये होईल.