मुंबई बंदराने (मुंबई पोर्ट ट्रस्ट) इतिहासातील सर्वाधिक वाहन वाहतूक हाताळणी चालू आर्थिक वर्षांतील आतापर्यंतच्या कालावधीत नोंदविली आहे. बंदरात एप्रिल २०१५ ते फेब्रुवारी २०१६ दरम्यान १,५३,६४७ वाहनांची चढ-उतार झाली. आधीच्या वर्षांतील याच कालावधीतील १,३९,८१२ वाहनांच्या तुलनेत यंदाची वाढ १८ टक्के राखली गेली आहे. बंदराच्या ‘एम व्ही होग ट्रान्सपोर्टर’कडून नियंत्रित केले जाणाऱ्या फलाट क्रमांक २ वरून सर्वाधिक ५३७६ वाहनांची निर्यात झाली आहे. सर्वाधिक निर्यातीमध्ये फोक्सव्ॉगन, मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, अशोक लेलॅन्ड, महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र, जनरल मोटर्स यांची आघाडी राहिली. वाहन निर्यातदारांना भेडसावणाऱ्या समस्या निवारणासाठी एक समिती नियुक्त केली गेली आहे.
एसव्हीसी बँकेला ‘आयबीए’चा पुरस्कार
मुंबई : सहकार क्षेत्रातील आघाडीच्या एसव्हीसी बँकेला सहकारातील उत्तम बँक ‘एबीपी न्यूज बीएफएसआय’द्वारे अलीकडेच गौरविण्यात आले. त्याचबरोबर बँकेला नुकताच ‘आयबीए’चा उत्कृष्ट तंत्रज्ञान पुरस्कारही मिळाला आहे. ‘आयबीए’च्या पुरस्कार वितरण सोहळ्यात या पुरस्काराचा स्वीकार सुहास सहकारी यांनी रिझव्‍‌र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एच. आर. खान यांच्या हस्ते केला. बँकेच्या कर्मचाऱ्यांचे परिश्रम या सन्मानामागे असल्याची भावना यानिमित्ताने बँकेचे अध्यक्ष सुरेश हेमाडी यांनी व्यक्त केली आहे.

सेन्सेक्स तेजीत; निफ्टी ७,५०० पल्याड
मुंबई : जवळपास शतकी भर टाकत सेन्सेक्सने सप्ताहाची अखेर तेजीसह नोंदविली. ९४.६५ अंश वाढीसह मुंबई निर्देशांक २४,७१७.९९ वर बंद झाला, तर २४.०५ अंश वाढीने निफ्टीला ७,५०० पुढील पल्ला गाठताना ७,५१०.२० पर्यंत मजल मारता आली. आठवडय़ात सेन्सेक्समध्ये ७१.५१ अंश तर निफ्टीत २४.८५ अंश वाढ झाली आहे. जानेवारी महिन्यातील औद्योगिक उत्पादन व फेब्रुवारीतील महागाई दराच्या आकडेवारीची वाट पाहात गुंतवणूकदारांनी येथे समभागांची खरेदी केली.