निवडणूकपूर्व सप्टेंबर २०१३ पासून सुरू झालेली आणि केंद्रात मोदी सरकारच्या स्थापनेपर्यंत शेअर बाजारात सुरू असलेल्या भरधाव तेजीत, बिनीचे शिलेदार म्हणजे सेन्सेक्स व निफ्टी या निर्देशांकात सहभागी असलेले अग्रणी समभागांची दमछाक झाली असताना, आता मधल्या फळीतील खेळाडू म्हणजे मिडकॅप आणि स्मॉल कॅप समभाग तेजीवर स्वार झालेले दिसतात. निवडणुकांचा मोदी कौल आल्यापासून चौथ्या दिवशी प्रमुख निर्देशांक थंडावून घरंगळले असताना, बुधवारी स्मॉल आणि मिड-कॅप समभागांमध्ये गुंतवणूकदारांचे आकर्षण कायम दिसले आणि बीएसई-मिडकॅप आणि बीएसई-स्मॉलकॅप निर्देशांकांनी अनुक्रमे १.३४ टक्के आणि १.८४ टक्क्यांनी झेप घेतली. सीएनएक्स मिडकॅप निर्देशांकाने बुधवारी इतिहासात प्रथमच १०,०००ची पातळी ओलांडली. किंबहुना गेल्या महिन्याभरात सेन्सेक्स आणि निफ्टी या प्रमुख निर्देशांकांच्या तुलनेत मिड व स्मॉल कॅप निर्देशांकांनी तेजीत सरशी मिळविलेली दिसते. सेन्सेक्सची महिन्याभरातील कमाई १३ टक्क्यांची तर, बीएसई स्मॉल कॅप निर्देशांक २०.९ टक्क्यांनी तर बीएसई-मिडकॅप निर्देशांक १५.३४ टक्क्यांनी उंचावला आहे. म्हणूनच मोजक्या समभागांपुरती संकुचित राहिलेल्या तेजीलाही आता व्यापक रूप मिळू लागले आहे. याचा प्रत्यय बुधवारच्या बाजारातील व्यवहारांनीही दिला. सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकांची घसरण झाली असताना, २,०८१ समभागांचे भाव वधारले, तर घसरणाऱ्या समभागांची संख्या ८८३ होती.