स्टेट बँकेने ग्राहकांच्या सुरक्षेसाठी एक मोठं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. जर स्टेट बँकेच्या ग्राहकांकडे मॅग्नेटिक स्ट्राईप असलेलं डेबिट कार्ड असेल तर ते बदलण्यासाठी ग्राहकांना आता अर्ज करावा लागणार आहे. ग्राहकांना मॅग्नेटिक स्ट्राईपच्या जागी आता अधिक सुरक्षित चीप असलेलं डेबिट कार्ड देण्यात येणार आहे. ३१ डिसेंबर पूर्वी ग्राहकांना आपलं जुनं डेबिट कार्ड बदलावं लागणार असल्याची माहिती स्टेट बँकेनं ट्विटरद्वारे दिली आहे.

मॅग्नेटिक स्ट्राईप असलेलं डेबिट कार्ड बदलून अधिक सुरक्षित ईएमव्ही चीप असलेलं कार्ड आणि पिन आधारित एसबीआय डेबिट कार्ड घेण्यासाठी आपल्या होम ब्रान्चमध्ये ३१ डिसेंबरपूर्वी अर्ज करा. गॅरेंटीड ऑथेंटिसिटी, अधिक सुरक्षित ऑनलाइन पेमेंट आणि फसवणुकीपासून वाचण्यासाठी अधिक सुरक्षा, अशा आशयाचं ट्विट स्टेट बँकेनं केलं आहे. रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सुचनांनुसार सर्व मॅग्नेटिक स्ट्राईप डेबिट कार्ड्सना पिन आधारित कार्ड आणि ईएमव्ही चिप कार्डांनी बदलण्यात येणार आहे.

मोफत मिळणार नवं कार्ड
स्टेट बँकेच्या ग्राहकांना नवं कार्ड मोफत देण्यात येणार आहे. बँकेनं ट्विटरद्वारे यासंदर्भातील माहिती दिली आहे. यासाठी ग्राहकांना आपल्या होम ब्रान्चमध्ये जाऊन बदलून घेता येईल किंवा ऑनलाइन पद्धतीनंही नव्या कार्डासाठी अर्ज करता येणार आहे. नव्या कार्डासाठी शुल्क आकारल्यास त्यासाठी पुराव्यांसह बँकेत संपर्क साधावा लागणार आहे.

नेटबँकिंगद्वारेही अर्ज करता येणार
दरम्यान, इंटरनेट बँकिंगद्वारेही नव्या डेबिट कार्डसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यापूर्वी आपला पत्ता बरोबर आहे किंवा नाही याची ग्राहकांना खात्री करावी लागणार आहे. नवं डेबिट कार्ड हे बँकेमध्ये दिलेल्या पत्त्यावरच पाठवलं जाणार आहे. तसंच बँकेमध्ये मोबाईल क्रमांक रजिस्टर असणंही अनिवार्य आहे.

कसा कराल अर्ज ?
सर्वप्रथम स्टेट बँकेच्या वेबसाईटला भेट द्या

टॉप नेव्हिगेशनमधून ई-सर्व्हिसेसमधील एटीएम कार्डचा पर्याय निवडा

व्हॅलिडेट करण्यासाठी पर्यायाची निवड करा

त्यानंतर युझिंग वन टाईम पासवर्डवर क्लिक करा

आपला अकाऊंट सिलेक्ट करा. त्यानंतर कार्डावरील नाव टाईप करा

टर्म अँड कंडिशनवर क्लिक करून सबमिट बटन दाबा