मागास समाजघटकांतील उद्योजकीय स्वप्नाला केवळ भांडवलाअभावी मुरड घातली जाऊ नये, यासाठी साहस भांडवलाची तजवीज करणाऱ्या आणि या वंचित घटकांतील नवउद्योजकांना उन्नत व्यावसायिक सेवासाहाय्य प्रदान करणाऱ्या व्यासपीठाचे अनावरण गुरुवारी मुंबईत करण्यात आले. दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री (डिक्की)च्या पुढाकाराने पहिल्या सेबी नोंदणीकृत ‘डिक्की एसएमई फंड’ या ‘साहसनिधी’चे अनावरण केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांच्या हस्ते झाले. आगामी १० वर्षांत ५०० कोटी रुपये उभारून दलित नवउद्योजकांना त्यांच्या उद्योग उभारणीसाठी अर्थसाहाय्य पुरविणे हे या साहसनिधीचे उद्दिष्ट आहे. ‘सिडबी’ या लघुउद्योग विकास बँकेने या साहसनिधीला अर्थमंत्र्यांच्या उपस्थितीत १० कोटी रुपयांचे प्राथमिक योगदानही आज दिले. ‘आम्ही नोकरी मागणारे नाही, नोकरी देणारे बनू’ असे या साहसनिधीचे ब्रीद असेल. या दलित फंडाच्या निधीची गरज पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील आर्थिक संस्था, बँका आणि आयुर्विमा महामंडळाला यात गुंतवणूक करायला सांगितले जाईल, अशी ग्वाही चिदम्बरम यांनी या वेळी बोलताना दिली. ‘डिक्की एसएमई फंडा’चे निधी व्यवस्थापक म्हणून वऱ्हाड समूहाकडून कामकाज पाहिले जाईल. पहिल्या वर्षांत १६० कोटी रुपयांच्या निधी उभारण्याचे उद्दिष्ट असेल आणि त्यातून निवडक २५ दलित उद्योजकांचे उद्यमस्वप्न साकारले जाईल, अशी माहिती डिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी या वेळी बोलताना दिली.