सहाव्या दिवशीही किंमतवाढ सुरू राहिल्याने पेट्रोलने किमतीतील उच्चांकाला मागे सारलेच आहे, आता या किमती लिटरमागे शंभर रुपयांची पातळीही दाखवतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात बहुतांश जिल्ह्य़ांत पेट्रोलच्या किमती ९१ ते ९३ रुपयांच्या घरात असून, सप्टेंबर २०१८ नंतरचा हा सर्वोच्च किंमत स्तर आहे.

देशातील तेल विपणन कंपन्यांनी सोमवारी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत सलग सहाव्या दिवशी वाढ केली. परिणामी पेट्रोलच्या किमती लिटरमागे आणखी ३० पैशांनी, तर डिझेलच्या किमती २६ पैशांनी वाढल्या आहेत.

करोनावरील लशीच्या यशस्वी चाचण्या आणि वर्षअखेपर्यंत प्रत्यक्षात लस येण्याच्या शक्यतेने आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेलाच्या किमती ऑक्टोबरअखेरपासून वाढत आल्या आहेत. लस बाजारात आल्यास, अर्थचक्रालाही गती मिळून इंधनाची मागणीही वाढेल, असे यामागे गणित आहे.

भारतात आयात होणाऱ्या खनिज तेलाच्या किमती प्रामुख्याने ‘ब्रेन्ट क्रूड’च्या किमतीवर बेतलेल्या असून, सध्या त्या प्रतिपिंप ५० अमेरिकी डॉलरच्या वेशीवर आहेत.

सोमवारी त्यात ०.८० टक्क्य़ांच्या घसरण झाली आणि त्या प्रतिपिंप ४८.८० डॉलरवर होत्या. डॉलरच्या तुलनेत कमजोर बनलेले रुपयाचे मूल्यही देशाच्या तेल आयात खर्चात वाढ करणारे ठरत आहे.

तेल निर्यातदार राष्ट्रांची संघटना ‘ओपेक’ने खनिज तेलाच्या उत्पादनांत वाढीचा निर्णय घेतला असल्याने, आंतरराष्ट्रीय स्तरावरील किमती लवकरच स्थिरावतील आणि परिणामी देशांतर्गत पेट्रोल-डिझेल किमतीच्या भडक्यावरही नियंत्रण मिळविता येईल, असा विश्वास केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केला.

‘ओपेक’ राष्ट्रांकडून प्रति दिन पाच लाख पिंपांनी उत्पादन वाढविले जाईल व पुरवठा मुबलक प्रमाणात वाढल्याने किमती कमी होतील, असे प्रधान यांनी सांगितले.

पेट्रोल, डिझेल हे अद्याप देशस्तरावर एकसामाईक असणाऱ्या वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटीच्या कक्षेबाहेर आहे.

इंधनावरील राज्य तसेच स्थानिक स्तरावरील विक्री कर आणि मूल्यवर्धित करांचे दर वेगवेगळे असल्याने पेट्रोल-डिझेलच्या किमतीदेखील राज्यवार निराळे आहेत.

नांदेड-परभणीत लिटरमागे ९३चा भाव

राज्यातील बहुतांश जिल्ह्य़ात पेट्रोलच्या किमती लिटरमागे नव्वदच्या पल्याड आहेत. पुण्यातील लिटरमागे ८९.९८ रुपयांचा अपवाद केल्यास, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, यवतमाळ, अमरावती, नागपूर, कोल्हापूर, रत्नागिरी अशा २५ जिल्ह्य़ात पेट्रोलने ९० रुपयांपल्याड गेला आहे. मुंबईत सोमवारी पेट्रोल लिटरमागे ९०.३४ रुपयांवर, तर डिझेल ८०.५१ रुपये प्रति लिटर विकले जात होते. राज्यात पेट्रोलच्या किमती सर्वाधिक नांदेड आणि परभणीत प्रति लिटर ९२ रुपये ४५ पैसे अशा सोमवारी होत्या.

निवडणुका आणि किंमतवाढ समीकरण

तेलाच्या किमती नियंत्रणमुक्त केल्याचा दावा केला जात असला तरी, त्या केव्हा वाढवाव्यात, केव्हा वाढ रोखून धरावी याचा निर्णय तेल कंपन्या राजकीय कल जोखूनच करीत असतात. आताही खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती प्रचंड अस्थिर बनल्या असताना, बिहार विधानसभा आणि अनेक राज्यांतील पोटनिवडणुका यांचे मतदान असल्याने तब्बल दोन महिने तेल कंपन्यांनी किंमतवाढ रोखून धरली. २२ सप्टेंबर ते २० नोव्हेंबर या दरम्यान पेट्रोलच्या किमती आहेत त्या पातळीवर स्थिर होत्या. मात्र २० नोव्हेंबरनंतर, कामकाज झालेल्या १८ दिवसांत तब्बल १५ वेळा पेट्रोलच्या किमती वाढविल्या गेल्या. निवडणुकांनंतरच्या १८ दिवसांत पेट्रोलच्या किमती लिटरमागे दोन रुपये ६५ पैशांनी, तर डिझेलच्या किमती तीन रुपये ४१ पैशांनी वाढल्या आहेत.