नव्या सप्ताहारंभी रुपयाचा प्रवास पुन्हा घसरणीकडे सुरू झाला. डॉलरच्या तुलनेत रुपया सोमवारी ६६.८१ पर्यंत घसरला. शुक्रवारच्या तुलनेत त्यातील घसरण १८ पैशांची राहिली.
भांडवली बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांच्या निधी काढून घेण्याच्या क्रियेमुळे अमेरिकी चलनाची मागणी वाढून रुपया कमकुमत बनला. परकी चलन विनिमय व्यासपीठावर सोमवारी तो ६६.९० या नरमाईनेच आला. व्यवहारा दरम्यान त्याचा तळ ६६.९२ पर्यंत घसरला. सत्रअखेर ६६.७० पर्यंत तो सावरला असला तरी दिवसअखेर मात्र त्यात ०.२७ टक्क्य़ांची घसरणच झाली. रुपयाबरोबरच अन्य सहा प्रमुख चलनांसमोरही डॉलर ०.२० टक्क्य़ाने मजबूत झाला.
तर मुंबईच्या सराफा बाजारात सोने दरांमध्येही सोमवारी चमक दिसली. स्टॅण्डर्ड प्रकारच्या धातूचा दर तोळ्यामागे १६० रुपयांनी वाढल्याने मौल्यवान धातू आता २६ हजारांपुढे, २६,००५ रुपयांवर गेला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने प्रति औन्स १,१०० डॉलरपुढे गेले आहे. उलट चांदीच्या दरांमध्ये मात्र सप्ताहारंभी घसरण झाली. पांढरा धातू किलोसाठी ३० रुपयांनी स्वस्त होत ३४,०१५ रुपयांवर आला.