पंतप्रधान मोदी सरकारची वर्षपूर्तीकडे वाटचाल सुरू असलेल्या महिन्यातच प्रमुख भांडवली बाजारांनी बुधवारी एकाच व्यवहारात तब्बल ३ टक्क्य़ांपर्यंतची आपटी नोंदविली. मोदी सरकारच्या कालावधीतील दुसरी मोठी घसरण नोंदविताना मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ७०० हून अधिक अंशांनी घसरत २७ हजारापासूनही दूर गेला. तर २०० हून अंशांनी आपटत राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी आता ८,१०० च्याही खाली आला आहे.
मुंबई निर्देशांकातील २०१५ मधील दुसरी मोठी घसरण बुधवारी नोंदली गेली. यापूर्वी ६ जानेवारी रोजी सेन्सेक्स एकाच व्यवहारात ८५५ अंशांनी खाली आला होता. बाजार आता गेल्या पाच महिन्याच्या तळात विसावला आहे. २६ मे २०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेत येऊ लागल्याचे दिसताच याच महिन्यात सुरुवातीला भांडवली बाजारात तेजीचे वातावरण होते.
केंद्रात नवे सरकार पूर्ण बहुमताने येताच आर्थिक सुधारणा राबविले जाऊन देशात अर्थगतीला वेग मिळेल, या आशेवर नऊ महिने बाजार तेजी नोंदवित होता. असे करताना यंदाच्या मार्चमध्ये ३०,००० या सर्वोच्च टप्प्यापर्यंतही गेला. मात्र त्याच्या या वरच्या टप्प्यापासून ३,३०० अंश खालीही त्याने आतापर्यंत प्रवास केला आहे. कर चिंतेने सेन्सेक्स तीन आठवडय़ात २,४०० अंशांनी खालीही आला होता. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला २८,७०० अंशावर असणारा मुंबई निर्देशांक आता २६,७१७ पर्यंत खाली आला आहे. महिन्याभरात २,००० अंशांची आपटी नोंदली गेली. संपूर्ण एप्रिल महिन्यातही सेन्सेक्स ९०० अंशांनी घसरला होता. सकाळी आठवडय़ातील तिसऱ्या सत्राची सुरुवात करताना सेन्सेक्स ८२ अंश खालच्या स्तरावर होता. मुंबई निर्देशांक २७,३५७ दरम्यानच्या प्रवासाने सुरुवातीला होता. निफ्टी याचवेळी ८,३०० चा टप्पा सोडत २९ अंश घसरण नोंदवित होता.
दुपारी दुपारपूर्वीच मुंबई शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकाने जवळपास ५०० अंश आपटी नोंदविली. याचवेळी २७ हजाराच्या खाली येत सेन्सेक्स पुन्हा एकदा गेल्या चार महिन्याच्या तळात आला. तर निफ्टीतही तब्बल २०० अंशांची आपटी नोंदली गेली.
अखेर.. सुरुवातीपासून घसरणारा सेन्सेक्स दिवसअखेर मंगळवारच्या तुलनेत ७२२.७७ अंशांनी घसरत २६,७१७.३७ वर तर निफ्टी २२७.८० अंश खाली येत ८,०९७.०० वर थांबला.
संग्रहित लेख, दिनांक 7th May 2015 रोजी प्रकाशित
मोदी कालावधी, वर्ष २०१५ मधील दुसरी मोठी घसरण
पंतप्रधान मोदी सरकारची वर्षपूर्तीकडे वाटचाल सुरू असलेल्या महिन्यातच प्रमुख भांडवली बाजारांनी बुधवारी एकाच व्यवहारात तब्बल ३ टक्क्य़ांपर्यंतची आपटी नोंदविली.

First published on: 07-05-2015 at 06:34 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Second big fall down in share market in narendra modi tenure