03 April 2020

News Flash

सेन्सेक्सचा त्रिफळा

अमेरिकन फेडरल रिझव्र्हच्या रोखे खरेदी आखडती घेण्याच्या निर्णयाचा शेजारच्या चीनसह भारतासारख्या विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम

| February 4, 2014 07:23 am

अमेरिकन फेडरल रिझव्र्हच्या रोखे खरेदी आखडती घेण्याच्या निर्णयाचा शेजारच्या चीनसह भारतासारख्या विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होण्याचे सावट सप्ताहारंभी भांडवली बाजारावर उमटले.
अस्वस्थ जागतिक शेअर बाजारांना साथ देत मुंबई निर्देशांकानेही सोमवारी एकाच व्यवहारात तब्बल ३०५ अंशांची आपटी नोंदविली. सेन्सेक्स थेट २०,२०९ वर येताना गेल्या ११ आठवडय़ांच्या तळात स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही ६ हजार ही गुंतवणूकदारांची अस्वस्थ मानसिक पातळी गाठली. एकाच व्यवहारातील ८७.७० अंश घसरणीमुळे निफ्टी आता ६,००१.८० या गेल्या जवळपास दोन अडिच महिन्याच्या किमान स्तरावर आला आहे.
भारताचा विकास दर लवकरच संपुष्टात येऊ पाहणाऱ्या आर्थिक वर्षांत किमान पातळीवर राहण्याच्या भितीनेही विदेशी गुंतवणूकदारांनी आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी निधीचा ओघ काढून घेतला. जानेवारीच्या मध्यात सर्वोच्च स्थानावर पोहोचल्यानंतर सलग पाच व्यवहारात घसरला होता. सप्ताह व महिन्याची अखेर करताना गेल्या शुक्रवारी त्यात काहीशी वाढ राखली गेली. (या दिवसात विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी ६५२.९७ कोटी रुपयांची खरेदी केली.) मात्र बाजाराने नव्या आठवडय़ाची व महिन्याची सुरुवात करताना मोठी घसरण नोंदविली आहे.
सोमवारच्या सेन्सेक्सच्या किमान स्तराने १३ नोव्हेंबर २०१३ चा समकक्ष तळ गाठला आहे. मुंबई शेअर बाजार यावेळी २०,१९४.४० वर होता. सेन्सेक्समधील तब्बल २५ कंपनी समभागांचे मूल्य सप्ताहारंभी रोडावले. यामध्ये व्याजदराशी निगडित एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक तसेच इन्फोसिस, टाटा मोटर्स अशा संमिश्र समभागांचाही समावेश राहिला. १२ पैकी केवळ आरोग्यनिगा क्षेत्र वगळता ११ निर्देशांकांमध्ये घसरण नोंदविली गेली. वधारलेल्या समभागांमध्ये वर्षांच्या उच्चांकाला पोहोचलेल्या गेल वरच्या स्थानावर राहिला. सूचिबद्ध कंपनी समभागांपैकी १,४३३ समभाग नकारात्मक यादीत नोंदले गेले. तर बाजारातील महिन्यातील व्यवहाराच्या पहिल्या दिवसाची उलाढाल १,७४५.४५ कोटी रुपयांवर घसरली.
गेले सलग दोन दिवस डॉलरच्या समोर कमकुवत ठरलेले भारतीय चलन परकी चलन व्यवहारात १२ पैशांनी उंचावले. भांडवली बाजारात सुमार निर्देशांक आपटी नोंदविली गेली असताना स्थानिक चलनाने मात्र गेल्या २७ पैशांची घसरण निम्म्याने भरून काढली. भांडवली बाजारातील विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची गरज भागविण्यासाठी अमेरिकन चलनाला मागणी राहिली. प्राथमिक माहितीनुसार संस्थागत गुंतवणूकदारांनी ७३५ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली. परिणामी रुपया व्यवहारात ६२.७० पर्यंत घसरल्यानंतर ६२.५६ या दिवसाच्या उच्चांकावर बंद झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 4, 2014 7:23 am

Web Title: sensex 2
Next Stories
1 भारताचे हवाई क्षेत्र पाकिस्तानपेक्षाही असुरक्षित
2 थंडीच्या कडाक्यात तापणार हवाई क्षेत्र
3 बँकांचा ‘एनपीए’ताण हलका करणारे रिझव्‍‌र्ह बँकेचे प्रारूप
Just Now!
X