प्रमुख निर्देशांकांचा सकारात्मक सप्ताहारंभ; मुंबई निर्देशांकात १३० अंश वाढ

रिझव्‍‌र्ह बँकेच्या मंगळवारच्या पतधोरणाकडे लक्ष असलेल्या गुंतवणूकदारांनी नव्या आठवडय़ाची सुरुवात निर्देशांकांमध्ये काहीशी तेजी नोंदवित केली. यंदाच्या पतधोरणात किमान व्याजदर कपात अटळ हे हेरून गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीच्या सत्राने दोन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये सोमवारी तेजी नोंदली गेली.
१३०.०१ अंश वाढीसह मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २५,३९९.६५ वर पोहोचला. तर ४५.७५ अंश वाढीसह राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने ७,७५८.८० पर्यंत मजल मारली. व्यवहारात दोन्ही प्रमुख निर्देशांक अनुक्रमे २५,४२४.१५ व ७,७०४.४० पर्यंत झेपावले होते.
रिझव्‍‌र्ह बँकेचे नवे पतधोरण मंगळवार, ५ एप्रिल रोजी जाहीर होत आहे. २०१५-१६ आर्थिक वर्षांतील ते पहिले पतधोरण आहे. त्यात व्याजदर कपात होईल, अशी अटकळ खुद्द केंद्रीय अर्थमंत्र्यांनीही बांधल्याने बाजारात उत्साह निर्माण झाला. नव्या आठवडय़ाच्या पहिल्या दिवसाचे व्यवहारच तेजीसह सुरू झाले. यावेळी सेन्सेक्स २५,४२४.१५ च्या वरच्या टप्प्यावर होता. तर दिवसभरात त्याचा तळ २५,२२३.४९ पेक्षा खाली राहिला नाही.
शुक्रवारच्या तुलनेत मुंबई निर्देशांकातील वाढ ही १३० अंशांची राहिली. नव्या आर्थिक वर्षांची सुरुवात सेन्सेक्सने गेल्या आठवडय़ात शुक्रवारी ७२ अंशांच्या घसरणीने केली होती.
सोमवारी सेन्सेक्समधील महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र, टाटा मोटर्स, बजाज ऑटो, हीरो मोटोकॉर्प हे वाहन क्षेत्रातील समभाग मार्चमधील वाहन विक्री वाढीच्या जोरावर ४.२९ टक्क्य़ांपर्यंत झेपावले. सेन्सेक्समधील १८ समभागांचे मूल्य वाढले. तर १२ समभागांना घसरणीला सामोरे जावे लागले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये दूरसंचार क्षेत्र सर्वाधिक २.७७ टक्क्य़ांनी वाढले.

इन्फिबिम :
देशातील पहिली ई-कॉमर्स कंपनीच्या माध्यमातून भांडवली बाजारात सूचिबद्ध होणाऱ्या इन्फिबिमचे समभाग मूल्य व्यवहाराच्या पहिल्याच दिवशी ३.१७ टक्क्य़ांनी उंचावत ४४५.७० रुपयांवर गेले. कंपनीने बाजारातील प्रक्रिये दरम्यान ४३२ रुपयांची किंमत जारी केली होती. कंपनीने ४५० कोटी रुपये उभारले आहेत. कंपनीचे भारतात २००७ पासून अस्तित्व आहे. कंपनीची भाग विक्री प्रक्रिया २१ ते २३ मार्च दरम्यान झाली. त्याला १.११ पट प्रतिसाद मिळाला होता. ३६०. ते ४३२ रुपये त्याचा किंमतपट्टा होता.

जिओमेट्रिक :
एचसीएल टेक्नॉलॉजिजच्या व्यवहारामुळे जिओमॅट्रिकचा समभाग सोमवारी मुंबई शेअर बाजारात त्याच्या गेल्या वर्षभराच्या वरच्या टप्प्यावर पोहोचला. एचसीएलने जिओमॅट्रिकचा सर्व व्यवसाय खरेदीची घोषणा केल्यानंतर जिओमॅट्रिकचा समभाग थेट २० टक्क्य़ांपर्यंत झेपावला. त्याला २३५.२० रुपये असे गेल्या वर्षभरातील सर्वोच्च मूल्य मिळाले. राष्ट्रीय शेअर बाजारातही हाच विक्रम नोंदला गेला. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अभियांत्रिकी सेवासंबंधीच्या गटातील एचसीएल टेक्नॉलॉजिजच्या रुपाने हा सर्वात मोठा व्यवहार होऊ पाहत आहे.

म्पॅसिस :
अमेरिकेच्या ब्लॅकस्टोनने म्पॅसिसमधील २६ टक्के भाग खरेदी करण्याची तयारी दाखविल्यानंतर कंपनीचे समभाग मूल्य व्यवहारअखेर २.७७ टक्क्य़ांपर्यंत घसरत ४५४.४५ रुपयांवर येऊन ठेपले. ब्लॅकस्टोन प्रती समभाग ४३० रुपये दराने म्पॅसिसमधील हिस्सा खरेदी करणार आहे. म्पॅसिसमध्ये असलेला एचपी एन्टरप्राईजेसचा हिस्सा खरेदीस ब्लॅकस्टोनने मान्यता दिली आहे. एचपीचा कंपनीत सध्या ६०.५ टक्के हिस्सा आहे. हा व्यवहार ७,०७१ कोटी रुपयांचा होईल. म्पॅसिसचे २०१५ मधील महसुली उत्पन्न ९०.४० कोटी डॉलर तर नफा १०.४० कोटी रुपये राहिला आहे.
हेक्झावेअर :
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील हेक्झावेअर टेक्नॉलॉजिजमधील हिस्सा विक्रीच्या चर्चेने कंपनीचे समभाग मूल्य व्यवहारा दरम्यान ७ टक्क्य़ांपर्यंत घसरले. कंपनीतील २० टक्के हिस्सा विकण्याची बॅरिंग एशियाबाबतची शक्यता वाढली आहे.