उच्चांकी शिखरावरून निर्देशांक माघारी

मुंबई : चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या सकल राष्ट्रीय उत्पादन वाढीची आकडेवारी जाहीर होण्यापूर्वी भांडवली बाजाराने तिचा धसका घेतल्याचे चित्र दिसून आले. गुरुवारी उच्चांकी टप्प्यावर पोहोचलेल्या बाजारात गुंतवणूकदारांनी सप्ताहअखेरीस नफेखोरीही साधली. परिणामी दोन्ही प्रमुख निर्देशांक त्यांच्या विक्रमी टप्प्यापासूनही माघारी फिरले.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स शुक्रवारी ३३६.३६ अंश घसरणीसह ४०,७९३.८१ पर्यंत खाली आला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ९५.१० अंश घसरणीने १२,०५६.०५ वर स्थिरावला. साप्ताहिक तुलनेत मुंबई निर्देशांक ४३४.४० अंशांनी, तर निफ्टी १४१.६४ अंशांनी वाढला आहे.

चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीतील सकल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर भांडवली बाजारातील सप्ताहअखेरच्या व्यवहार समाप्तीनंतर जाहीर झाला. पहिल्या तिमाहीप्रमाणे तो दुसऱ्या तिमाहीतही सहा वर्षांच्या तळात असल्याचे स्पष्ट झाले.

भांडवली बाजाराचे प्रमुख निर्देशांक चालू आठवडय़ात तीन सत्रांत विक्रमी टप्पा नोंदविणारे ठरले. गुरुवारीही हा क्रम कायम होता. आठवडय़ाच्या शेवटच्या सत्रात मात्र गुंतवणूकदारांनी नफेखोरी साधत दोन्ही प्रमुख निर्देशांकांना त्यांच्या वरच्या टप्प्यापासून खाली खेचले.

सत्रात गुरुवारच्या तुलनेत ४६६ अंश झेप घेणारा सेन्सेक्स दिवसअखेर जवळपास एक टक्क्यापर्यंत घसरला, तर निफ्टीत पाऊण टक्क्यापर्यंत घसरण नोंदली गेली. अमेरिका-चीनदरम्यानच्या व्यापारचर्चेबाबत सकारात्मकता व्यक्त करणारे तेजीतील निर्देशांक अर्थव्यवस्थेच्या प्रगतीबाबत शंका निर्माण करते झाले.

मुंबई निर्देशांकात येस बँक सर्वाधिक २.५० टक्क्यांपर्यंतची घसरण नोंदविणारा समभाग ठरला. त्याचबरोबर हिंदुस्थान युनिलिव्हर, महिंद्र अँड महिंद्र, स्टेट बँक, टाटा मोटर्स, वेदांता आदीही २ टक्क्यांपर्यंत घसरले.

भारती एअरटेल, एचडीएफसी बँक, एनटीपीसी आदी मात्र सेन्सेक्सच्या घसरणीच्या यादीत राहिले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये ऊर्जा, पोलाद, वाहन, तेल व वायू, भांडवली वस्तू १.४६ टक्क्यांपर्यंत घसरले, तर दूरसंचार, स्थावर मालमत्ता, बहुपयोगी क्षेत्रीय निर्देशांक तुलनेत अधिक, २.५४ टक्क्यांपर्यंत वाढले.

मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप जवळपास प्रत्येकी अर्ध्या टक्क्यापर्यंत वाढले.