27 February 2021

News Flash

सेन्सेक्स-निफ्टीचा मोठय़ा उसळीने नवीन उच्चांक

सोमवारी भांडवली बाजारात नव्या महिन्यातील वायदापूर्तीच्या व्यवहारांचे पहिले सत्र पार पडले.

प्रतिनिधिक छायाचित्र

‘आर्थिक सर्वेक्षणा’च्या वाढीव विकासदर आशावादाने बाजाराला हर्ष

नोटाबंदी आणि ‘जीएसटी’ या नवीन अप्रत्यक्ष करप्रणालीनंतर औद्योगिक क्षेत्राची गती रेंगाळली असतानाही,  देशाचा विकास दर सात टक्क्यांपल्याड झेप घेईल, असा विश्वास व्यक्त करणाऱ्या आर्थिक सर्वेक्षणाच्या आशावादाने होताना गुंतवणूकदारांनी भांडवली बाजाराला पुन्हा तेजीच्या लाटेवर नेऊन सोडले. दोन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये सप्ताहारंभी शुक्रवारच्या तुलनेत अर्ध्या टक्क्याची वाढ नोंदविल्यानंतर सेन्सेक्स तसेच निफ्टी त्याच्या नव्या उच्चांकावर विराजमान झाले.

२३२.८१ अंश वाढीसह सेन्सेक्स ३६,२८३.२५ वर स्थिरावला. तर ११,१३०.४० अंश भर नोंदवत निफ्टी ११,१३०.४० पर्यंत पोहोचला. प्रमुख निर्देशांक यापूर्वी २४ जानेवारी रोजी सर्वोच्च स्थानी होते. तर २५ जानेवारी रोजी त्यात काही प्रमाणात घसरण नोंदली गेली होती.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेत मांडल्या गेलेल्या आर्थिक सर्वेक्षणात २०१८-१९ या आगामी वित्त वर्षांत विकास दर ७ ते ७.५० टक्के अंदाजित केला आहे. त्याचबरोबर भारतीय अर्थव्यवस्था नोटाबंदी आणि वस्तू व सेवा करप्रणालीसारख्या धक्क्यातून सावरली असल्याचा उल्लेखही सर्वेक्षणात करण्यात आला.

सोमवारी भांडवली बाजारात नव्या महिन्यातील वायदापूर्तीच्या व्यवहारांचे पहिले सत्र पार पडले. नव्या आठवडय़ाची सुरुवातच दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी तेजीसह केली. सकाळच्या व्यवहारात मुंबई निर्देशांकात गेल्या सप्ताहअखेरच्या तुलनेत ३०० अंशांहून अधिक वाढ नोंदली जात होती. तर निफ्टी सकाळच्या सत्रात पाऊणशेहून अधिक अंश वाढीने ११,१५० नजीक पोहोचला होता.

दुपारी आर्थिक सर्वेक्षण सादर झाल्यानंतर तेजीने अधिक गती घेतली. असे करताना सेन्सेक्स व्यवहारात ३६,४४३.९८ पर्यंत झेपावला. तर ११,१६३ पर्यंत उंचावला.

सोमवारच्या भांडवली बाजाराच्या व्यवहारावर प्रतिक्रिया देताना जिओजित फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेसचे प्रमुख संशोधक विनोद नायर यांनी सांगितले की, भांडवली बाजार सध्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडून अधिक अपेक्षा ठेवत असल्याचे दिसून येत आहे. तिसऱ्या तिमाहीतील कंपन्यांच्या वित्तीय निष्कर्षांनंतरच्या गेल्या आठवडय़ातील तेजीनंतर आता यात भर पडत आहे.

सोमवारी सेन्सेक्समध्ये मारुती सुझुकीचा समभाग तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या जोरावर अव्वल राहिला. त्याचे मूल्य जवळपास ४ टक्क्यांनी वाढले. त्याचबरोबर एचडीएफसी लिमिटेड, टीसीएस, हीरो मोटोकॉर्प, कोटक महिंद्र बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, टाटा स्टील, बजाज ऑटो, एचडीएफसी बँक, सन फार्मा, लार्सन अँड टुब्रो, इन्फोसिस, महिंद्र अँड महिंद्र, विप्रो, कोल इंडिया, इंडसइंड बॅंक, एशियन पेंट्स आदी २.४८ टक्क्यांपर्यंत वाढले. तर घसरणीच्या यादीतील डॉ. रेड्डीज्, भारती एअरटेल, आयटीसी, येस बँक, ओएनजीसी, अ‍ॅक्सिस बँक, स्टेट बँक आदी तब्बल ६ टक्क्यांपर्यंत खाली आले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये वाहन, माहिती तंत्रज्ञान, ग्राहकपयोगी वस्तू, पोलाद, भांडवली वस्तू, बँक आदी एक टक्क्यापर्यंत वाढले. तर सार्वजनिक उपक्रम, पायाभूत, आरोग्यनिगा, तेल व वायू, ऊर्जा, स्थावर मालमत्ता आदी निर्देशांकांवर दबाव राहिला.

मुंबई शेअर बाजारातील स्मॉल कॅप व मिड कॅप निर्देशांक मात्र अनुक्रमे एक व पाऊण टक्क्यांनी घसरले.

आशियातील अनेक निर्देशांक घसरते राहिले. तर युरोपीय भांडवली बाजारांची नव्या सप्ताहाची सुरुवात निर्देशांक वाढीसह झाली.

‘टीसीएस’ची बाजार भांडवलात ‘रिलायन्स’वर सरशी

मुंबई : मुंबई शेअर बाजारावर अव्वल बाजार भांडवलासह अग्रस्थान राखण्यात टाटा समूहातील टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेस अर्थात टीसीएस यशस्वी ठरली. सोमवारी रिलायन्स इंडस्ट्रीजवर तिने सरशी केली. टीसीएसचे बाजार भांडवल सोमवारी मुंबई शेअर बाजारात ६.११ लाख कोटी रुपयांवर गेले. तर स्पर्धक रिलायन्सचे बाजार भांडवल या पासून अवघे १,१७०.८६ कोटी रुपये मागे राहिले. सोमवारी टीसीएसचा समभाग २.४८ टक्क्यांनी झेपावला. तर रिलायन्समध्ये ०.०८ टक्के घसरण नोंदली गेली. ६ लाख कोटी रुपयांचा बाजार भांडवल टप्पा राखणारी रिलायन्सनंतरची दुसरी कंपनी म्हणून टीसीएसची गेल्या बुधवारी नोंद झाली होती. मुंबई शेअर बाजार दफ्तरी बाजार भांडवल मिळविण्यात आघाडीच्या पाच कंपन्यांमध्ये टीसीएस, रिलायन्सबरोबर एचडीएफसी बँक, आयटीसी, एचडीएफसी लिमिटेड अशी क्रमवारी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2018 3:02 am

Web Title: sensex nifty closed at record high
Next Stories
1 यंदा वित्तीय तूट वाढणार – निती आयोग
2 एअर इंडियाची निर्गुतवणूक पुढील आर्थिक वर्षांत!
3 डिसेंबरमधील ‘जीएसटी’ कर संकलनात वाढ
Just Now!
X