भांडवली बाजारातील तेजी आठवडय़ाच्या सलग दुसऱ्या व्यवहारात कायम राहिली; मात्र सेन्सेक्स तसेच निफ्टी या दोन्ही निर्देशांकातील वाढीचे प्रमाण सोमवारच्या तुलनेत किरकोळ राहिले.
बँक, वाहन क्षेत्रातील समभागांच्या जोरावर सेन्सेक्समध्ये ४५.३५ अंश भर पडून मुंबई निर्देशांक २६ हजारांपुढे, २६,०७९.४८ वर बंद झाला. तर निफ्टीत केवळ ३.८० अंश वाढ झाली. परिणामी राष्ट्रीय शेअर बाजाराचा हा निर्देशांक ७,९२८.९५ पर्यंतच पोहोचू शकला.
चालू महिन्यातील वायदापूर्तीचे व्यवहार येत्या गुरुवारी होणार आहेत. मंगळवारी सेन्सेक्समधील बजाज ऑटो, महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र, हीरो मोटोकॉर्प, गेल इंडिया, एचडीएफसी, भारती एअरटेल, अदानी पोर्ट्स, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक यांच्या मूल्यात वाढ नोंदली गेली. सेन्सेक्समधील १९ समभाग वाढले, तर वाहन निर्देशांक सर्वाधिक अध्र्या टक्क्यांपर्यंत वाढला होता. आरोग्यनिगा, तेल व वायू निर्देशांकही वाढले.
‘अ‍ॅम्टेक ऑटो’ला सेबीचा दंड
मुंबई: गुंतवणूकदारांच्या तक्रारींचे निवारण न केले प्रकरणात चर्चेतील अ‍ॅम्टेक ऑटोवर भांडवली बाजार सेबीने ५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. कंपनीचे गुंतवणूकांच्या तक्रार निवारणाचे प्रमाण तीन पैकी केवळ एकच असल्याचे यानिमित्ताने सेबीने स्पष्ट केले आहे. अ‍ॅम्टेक ऑटोबाबत पत्ता तसेच स्वाक्षरीत बदल न केल्याच्या तसेच लाभांश न मिळाल्याच्या गुंतवणूकदारांच्या तक्रारी होत्या, असे सेबीचे अधिकारी विजयंत कुमार वर्मा यांनी म्हटले आहे. कर्जभाराच्या डोंगरावर असलेल्या अ‍ॅम्टेक ऑटो काही दिवसांपूर्वीच चर्चेत आली. परिणामी विदेशी गुंतवणूकदारांनीही त्यामधील गुंतवणूक गेल्या काही महिन्यांमध्ये कमी केली आहे.