गेल्या वर्षांतील दसऱ्यापासून मुंबई शेअर बाजाराच्या मत्तेत चार लाख कोटींनी वाढ

मुंबई : सोने, वाहन, घर खरेदीसाठी महत्त्वाचा मानला जाणारा पारंपरिक  मुहूर्ताचा दसऱ्याचा सण भांडवली बाजारासाठी मात्र फारसा उत्सवी राहिलेला नाही. भांडवली बाजाराचे प्रमुख निर्देशांक   गेल्या वर्षांच्या दसऱ्यापासून केवळ एकेरी अंकाने वाढले आहेत.

गेल्या वर्षभरात मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची मालमत्ता ४ लाख कोटी रुपयांनी वाढली असून प्रमुख सेन्सेक्स निर्देशांक ८ टक्क्यांनी वाढला आहे. तर निफ्टीतील वाढ या दरम्यान कमी, ७ टक्के राहिली आहे.

मुंबई शेअर बाजारातील बीएसई ५०० निर्देशांकातील ३२ कंपन्यांच्या समभागांचे मूल्य थेट ५० ते १०० टक्क्यांपर्यंत झेपावले आहे. इंटरग्लोब एव्हिएशन, क्रेडिटएक्सेस ग्रामीण, आवास फायनान्शिअर्स, इन्फो एज, टायटन कंपनी, स्पाइसजेट, अदानी पॉवरसारख्या कंपन्यांचा यामध्ये समावेश आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय, संरक्षण, व्यापार अनिश्चितता आणि स्थानिक पातळीवरील गुंतवणूकदारांची निराशा यामुळे येथील भांडवली बाजाराकडे खरेदी तसेच निर्देशांक वाढीबाबत तशी पाठच राहिली आहे.

निफ्टी निर्देशांकातील पहिल्या २० कंपन्यांनी दुहेरी अंकातील समभागमूल्य वाढ नोंदविली आहे. यातील बजाज फायनान्स, बीपीसीएल कंपन्यांनी ८० टक्क्यांची मूल्यकमाई केली आहे.

असे असले तरी मुंबई शेअर बाजारातील ५०० कंपन्यांमधील ५० टक्क्यांहून अधिक कंपन्यांनी नकारात्मक परतावा दिला आहे. त्यातील ४० टक्के कंपन्यांचा परतावा ५० ते ९० टक्क्यांहून कमी आहे. यात सेल, सुझलॉन, रिलायन्स पॉवर, रिलायन्स कम्युनिकेशन्सला अधिक फटका बसला आहे.

गेल्या वर्षभरातील आठ महिन्यांत विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी खरेदीची भूमिका बजावली आहे. ऑक्टोबर २०१८ मध्ये त्यांनी ४,००० कोटी रुपये काढून घेतले होते. तर मार्च २०१९ मध्ये त्यांची गुंतवणूक ५,००० कोटी रुपयांची राहिली आहे. जुलै २०१९ मध्ये परिपूर्ण अर्थसंकल्पात सुचविलेल्या भांडवली बाजारातील गुंतवणुकीवरील करामुळे गेल्या अनेक महिन्यांतील अनिश्चितता संबंधित कर मागे घेईपर्यंत राहिली होती. मात्र देशातील बँक, गैरबँकिंग वित्त कंपन्यांच्या अर्थचिंतेने ती पुन्हा कायम राहिली.