प्रमुख निर्देशांक उच्चांकापासून माघारी

मुंबई : भांडवली बाजाराचे प्रमुख निर्देशांक शुक्रवारी त्यांच्या विक्रमी टप्प्यापासून माघारी फिरले. जागतिक भांडवली बाजारावर प्रतिक्रिया देताना येथेही समभाग विक्रीचे धोरण राहिल्याने सप्ताहअखेर सेन्सेक्स व निफ्टी गुरुवारच्या तुलनेत काही प्रमाणात घसरले.

मुंबई व राष्ट्रीय शेअर बाजाराने आठवडय़ाच्या आत नव्या निर्देशांक विक्रमाची नोंद गुरुवारी केली होती. असे करताना सेन्सेक्स ५३ हजार पार, तर निफ्टी १६ हजारांच्या उंबरठय़ावर होता. आठवडय़ाच्या शेवटच्या सत्रारंभीही हाच कल होता.

व्यवहारात ५३,२९०.८१ पर्यंत मजल मारल्यानंतर सेन्सेक्स १८.७९ अंश घसरणीमुळे ५३,१४०.०६ वर स्थिरावला. तर सत्रात १५,९६२.२५ पर्यंत उंचावल्यानंतर निफ्टी अवघ्या ०.८० अंश घसरणीने १५,९२३.४० पर्यंत बंद झाला. पाच व्यवहारांत प्रथमच निर्देशांकाने घसरण नोंदवली.

चालू सप्ताहात मुंबई निर्देशांकात ७५३ अंश भर पडली आहे, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी या दरम्यान २३३.६० अंशांनी वाढला आहे. टक्केवारीत हे प्रमाण अनुक्रमे १.४३ व १.४८ टक्के आहे.

दरम्यान, प्रारंभिक खुल्या भागविक्रीच्या शेवटच्या दिवशी आघाडीचा तंत्रस्नेही मंच झोमॅटोला गुंतवणूकदारांचा १०.७ पट प्रतिसाद लाभला. कंपनीने ७१.९२ कोटी समभाग उपलब्ध करून दिले असताना ७७०.०७ कोटी समभागांकरिता बोली लागली.