सेन्सेक्सची सलग चार दिवसात १,४९२.१८ अंशांची कमाई
जवळपास ४० अंश वाढीने सप्ताहाची अखेर करताना मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स शुक्रवारी त्याच्या महिन्याच्या वरच्या टप्प्यावर पोहोचला. ३९.४९ अंश भर घालत मुंबई निर्देशांकाने २४,६४६.४८ हा स्तर गाठला. बाजाराने ही पातळी यापूर्वी १ फेब्रुवारी रोजी गाठली होती, तर सत्रात ७,५००चा टप्पा गाठणारा निफ्टी दिवसअखेर मात्र ९.७५ अंश वाढीसह ७,४८५.३५ वर राहिला.
सप्ताह तुलनेत सेन्सेक्सची गेल्या सात वर्षांतील सर्वोत्तम वाढ या आठवडय़ात राहिली आणि निफ्टीबाबत तर ती तब्बल २००९ नंतरची नोंदली गेली. रिझव्‍‌र्ह बँकेच्या संभाव्य व्याज दरकपातीच्या आशेवर बाजारातील प्रमुख निर्देशांक संपूर्ण चालू सप्ताहादरम्यान तेजीच्या हिंदोळ्यावर झुलता राहिला. सेन्सेक्सने चालू आठवडय़ात सलग चार दिवस १,४९२.१८ अंशांची म्हणजे ६.४४ टक्क्य़ांची वाढ नोंदविली आहे. तर निफ्टीनेही ४५५.६० अंशांनी म्हणजे ६.४८ टक्क्य़ांनी कमाई करीत वेगाने चढ दाखविला आहे.
२४,५३१.८० या संथ स्तरावर सुरुवात करणाऱ्या सेन्सेक्सने सकाळच्या सत्रातच २३,१४१.०८ हा व्यवहारातील तळही गाठला, तर दिवसाच्या उत्तरार्धात तो थेट २४,७१९.०५ पर्यंत झेपावला.
डॉलरच्या तुलनेतील रुपयाची ६७ पर्यंतची भक्कमताही एकूण निर्देशांकांत भर घालणारी ठरली.
मुंबई निर्देशांकातील भेल, स्टेट बँक, कोल इंडिया, टाटा मोटर्स, सिप्ला, ओएनजीसी, बजाज ऑटो, डॉ. रेड्डीज्, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, टाटा स्टील, इन्फोसिस, हीरो मोटोकॉर्प, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र आदी तेजीच्या यादीत राहिले. सेन्सेक्समधील निम्म्याहून अधिक समभागांचे मूल्य वाढले.
क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये २.१५ टक्क्यांसह पोलाद निर्देशांक वरचढ ठरला. मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांक अनुक्रमे १.१३ व ०.७५ टक्क्यांनी वाढले.

सोने तोळ्यामागे २९,३०० पुढे
मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात सोने दरातील मोठय़ा वाढीने येथील सोन्याचे दरही शुक्रवारी तोळ्यामागे २९,३०० रुपयापुढे गेले. स्टँडर्ड सोने शुक्रवारी प्रति १० ग्रॅममागे ४५५ रुपयांनी वाढले, तर शुद्ध सोन्याचा दर प्रति तोळ्यामागे याच प्रमाणात वाढून २९,४५० रुपयांवर पोहोचला. चांदीही किलोमागे ९७५ रुपयांची वाढून ३७,६५० भावावर गेली. उत्पादन शुल्कावरून सराफांचे देशस्तरावर बंद आंदोलन सुरू असतानाही मौल्यवान धातूच्या घाऊक किमतीतील दरवाढ लक्षणीय मानली जात आहे.

 

रुपया अडीच महिन्यांच्या उच्चांकावर
मुंबई : डॉलरच्या तुलनेत सलग सहाव्या सत्रात उंचावणारी कामगिरी बजावताना स्थानिक चलन शुक्रवारी गेल्या अडीच महिन्यांच्या वरच्या टप्प्यावर पोहोचले. २६ पैसे वाढीसह रुपया आठवडय़ातील शेवटच्या सत्रात ६७.०८ वर राहिला. भांडवली बाजारात पुन्हा विदेशी गुंतवणूकदार संस्थांना निधी ओघ राहिल्याने रुपयाही सशक्त बनला आहे. शुक्रवारच्या सत्राची ६७.२५ अशी तेजीसह सुरुवात करणारे स्थानिक चलन व्यवहारात ६७.०८ पर्यंत झेपावला. सत्रअखेरचा त्याचा स्तर हा १४ डिसेंबर २०१५ मधील ६७.०९ च्या तुलनेत वरचढ राहिला आहे. सरलेला आठवडा रुपयासाठी दमदार राहिला. रुपयाचे प्रति डॉलर विनिमय मूल्य या दिवसांत १५४ पैशांनी अर्थात २.२४ टक्क्य़ांनी मजबूत बनले आहे.