भाजपा नेते एस. एम. कृष्णा यांचे जावई आणि कॅफे कॉफी डेचे (सीसीडी) मालक आणि संस्थापक व्ही. जी. सिद्धार्थ सोमवारपासून बेपत्ता झाले आहेत. मंगळुरू पोलिसांनी सिद्धार्थ यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे सिद्धार्थ यांचा शोध सुरु असतानाच शेअर बाजारामध्ये सीसीडीचे शेअर्स २० टक्यांनी पडले आहेत.

साकलेशपूर येथे एका महत्वाच्या मिटिंगसाठी जाताना वाटतेच सिद्धार्थ बेपत्ता झाले. सिद्धार्थ हे शेवटी नेत्रावती नदीवरील उल्लाल पूलाजवळ दिसून आले होते. मंगळूरहून साकलेशपूरला जातना ५५ वर्षीय सिद्धार्थ यांनी अचानक आपल्या गाडीच्या चलाकाला गाडी थांबवण्यास सांगितले. तसेच मी खाली वॉकला जाऊन येत असं सांगून ते निघून गेल्याचे चालकाने पोलिसांना सांगितले आहे. २०० हून अधिक पोलीस कर्मचारी, २५ बोटी या पुलाच्या परिसरामध्ये नदीमध्ये सिद्धार्थ यांचा शोध घेत आहे. सिद्धार्थ यांना शोधण्यासाठी बोटींबरोबर पोलीसांनी स्निपर कुत्र्यांनाही आणले आहे. दरम्यान, सोमवारपासून सिद्धार्थ यांचा मोबाईलही स्विच ऑफ आहे. त्यामुळे एस. एम. कृष्णा यांच्यासहीत त्यांचे पूर्ण कुटुंब चिंतेत आहे. सिद्धार्थ यांच्या शोधासाठी पोलीसांनी शोध मोहीम सुरु केली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा हेदेखील एस. एम. कृष्णा यांच्या निवासस्थानी पोहचले आहेत.

सीसीडीचे भवितव्य धोक्यात

नुकताच सिद्धार्थ यांनी माईंडट्री लिमिटेड या कंपनीमधील आपल्या मालकीच्या शेअर्सपैकी २० टक्के शेअर्स लॉर्सन अॅण्ड टुर्बो लिमिटेड या कंपनीला विकले होते. रॉयर्टसने स्थानिक प्रसारमाध्यमांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार सिद्धार्थ हे त्यांच्या मालकीची सीसीडीची मालकी कोका कोला कंपनीला विकण्यासंदर्भात कंपनीशी चर्चा करत होते.