टॅबलेट, डिजिटल पेन अथवा स्मार्ट फोनचा वापर करणाऱ्या ‘केव्हाही व कुठूनही’ म्युच्युअल फंडासंबंधीच्या आपल्या उलाढाली शक्य बनविणारी तंत्रज्ञानाधारित सुविधा कॉम्प्युटर एज मॅनेजमेंट सव्र्हिसेस प्रा. लि. अर्थात कॅम्सद्वारे प्रस्तुत करण्यात आली आहे. शुक्रवारी भारतीय रोखे व विनिमय मंडळ (सेबी)चे कार्यकारी संचालक अनंत बरुआ यांच्या हस्ते तिचे उद्घाटन करण्यात आले.
गुंतवणूकदार घरी अथवा कार्यालयात बसून आपल्या फंडाबाबतचे खरेदी-विक्रीचे प्रस्ताव सादर करू शकेल आणि त्याची पूर्तताही विनाविलंब होऊन, त्याच दिवसाच्या नक्त मालमत्ता मूल्य (एनएव्ही)चा गुंतवणूकदाराला लाभ मिळेल, अशी ही ‘एनीटाइम, एनीव्हेअर म्युच्युअल फंड’ सुविधा सामान्य गुंतवणूकदारांना उपयुक्त ठरेल. परंतु या सुविधेतून देशभरातील म्युच्युअल फंडांच्या वितरक समुदायाची सर्वाधिक सोय होईल, असे कॅम्सचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी एन. के. प्रसाद यांनी सांगितले. म्युच्युअल फंडांना ज्या ठिकाणी पोहोचता आलेले नाही, अशा नव्या ठिकाणी व्यवसाय विस्तारण्याची संधी यातून मिळेल आणि या सुविधेचे उद्दिष्टही बडय़ा शहरांपल्याड छोटी नगरे व खेडय़ांमध्ये फंड उद्योगाचा विस्तार व्हावा, असेच असल्याचे त्यांनी सांगितले. या सेवेअंतर्गत ई-केवायसी, डिजिटल फॉम्र्स, ऑनलाइन अकाऊंट सेट-अप, ई-ऑर्डर्स, ई-पेमेंट्स व तत्सम अनेक उलाढालविषयक सुविधा गुंतवणूकदारांना मिळणार असून, त्यांचा गुंतवणुकीचा अनुभव विनासायास बनेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 6, 2014 3:01 am