रिझव्‍‌र्ह बँकेच्या येत्या आठवडय़ात जाहीर होणाऱ्या पतधोरणात व्याजदर कपात होण्याची कमी शक्यता वर्तविली जात आहे. मध्यवर्ती बँकेचे पुढील द्विमासिक पतधोरण २ फेब्रुवारी रोजी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन हे जाहीर करणार आहेत. केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच्या या अर्थसंकल्पात किमान पाव टक्के व्याजदर कपातीचा अंदाज मात्र बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचने व्यक्त केला आहे. सिटीग्रुपने अर्थसंकल्पापूर्वी दर कपात शक्य नाही, असे मत व्यक्त केले आहे.
‘बँक मुदतीबाबत पुनर्विचार नाही’
वाढत्या बुडित कर्जाचा सामना करणाऱ्या देशातील बँकांबाबत कोणतीही सहानुभूती न दाखविण्याचा निर्णय रिझव्‍‌र्ह बँकेने घेतला आहे. बँकांना मार्च २०१७ पर्यंत त्यांचा ताळेबंद सुधारण्याकरिता दिलेल्या मुदतीबाबत पुनर्विचाराची गरज नाही, असे रिझव्‍‌र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एस. एस. मुंद्रा यांनी स्पष्ट केले आहे. उलट बँकांनी त्या दिशेने आपली पावले टाकण्यास आता सुरुवात करावी, असे त्यांनी सुचविले.