गेल्या शुक्रवारी जाहीर झालेल्या चार महिन्याच्या तळातील देशाच्या औद्योगिक उत्पादनाच्या दराबाबत चिंता व्यक्त करतानाच लवकरच स्पष्ट होणाऱ्या महागाई दरावर लक्ष ठेवत गुंतवणूकदारांनी सप्ताहारंभीचे व्यवहार सावध नोंदविले. माहिती तंत्रज्ञान, ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागा खरेदी जोरावर अखेर प्रमुख निर्देशांकांना किरकोळ वाढ नोंदविता आली.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स शुक्रवारच्या तुलनेत अवघ्या १७.३७ अंशांची वाढ नोंदवून सोमवारअखेर २८,३५१.६२ वर बंद झाला. तर अस्थिरतेच्या वातावरणात राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीला ११.५० अंश वाढीसह सप्ताहारंभाची अखेर ८,८०० वर, ८,८०५.०५ पर्यंत राखता आली. सत्रात सेन्सेक्स २८,४६० नजीक तर निफ्टी ८,८२५ च्या पुढे राहिला.

ग्राहकपयोगी वस्तू व निर्मिती क्षेत्राच्या सुमार कामगिरीमुळे डिसेंबरमधील औद्योगिक उत्पादन दर उणे ०.४ टक्के नोंदला गेला. त्याचे अपेक्षित पडसाद बाजारात आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी उमटले. २८,४५०.४२ स्तरावर सुरुवात करणारा मुंबई निर्देशांक सत्रात २८,१९७.३८ पर्यंत खाली आला. तर त्याचा व्यवहारातील वरचा टप्पा २८,४५८.८० पर्यंत झेपावला.

गेल्या सलग दोन व्यवहारात सेन्सेक्सने ४४.३३ अंश भर नोंदविली होती. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीचा प्रवास सोमवारी ८,७५४.२० पर्यंत घसरला होता.