पीटीआय, नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षांत प्रत्यक्ष करासंबंधी १४.२० लाख कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय उद्दिष्टाच्या तुलनेत प्रत्यक्ष संकलन सुमारे ३० टक्क्यांनी अधिक राहण्याची शक्यता, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने मंगळवारी व्यक्त केली. चालू आर्थिक वर्षांत कर संकलनात २५-३० टक्क्यांनी वाढ झाल्यास १७.७५ ते १८.४६ लाख कोटी रुपये निव्वळ प्रत्यक्ष कर जमा होईल आणि इतक्या मोठय़ा फरकाने अर्थसंकल्पीय अंदाजाला ओलांडले जाऊ शकेल, असा विश्वास केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (सीबीडीटी) अध्यक्ष नितीन गुप्ता यांनी व्यक्त केला. पुढील आर्थिक वर्षांच्या अर्थसंकल्पात करचोरी रोखण्यासाठी ऑनलाइन खेळांच्या बक्षीस रकमेवर उद्गम कर अर्थात टीडीएसच्या तरतुदीमध्ये काही बदल केले जाऊ शकतात, असे सूतोवाच त्यांनी केले. सध्या ऑनलाइन खेळांसंबंधी १० टक्के टीडीएस कपातीची तरतूद आहे. 

चालू आर्थिक वर्षांत १ एप्रिल ते १० नोव्हेंबर या दरम्यान एकूण प्रत्यक्ष कर संकलन हे मागील वर्षांतील याच कालावधीच्या तुलनेत ३१ टक्क्यांनी वाढून १०.५४ लाख कोटी रुपयांवर गेले आहे. करदात्यांना परतावा (रिफंड) वितरीत केला गेल्यानंतर, निव्वळ संकलन हे ८.७१ लाख कोटी रुपये झाले, जे संपूर्ण वर्षांसाठी कर संकलनाच्या अर्थसंकल्पीय उद्दिष्टाच्या तुलनेत ६१.३१ टक्के इतके आहे. प्रत्यक्ष कर संकलनातील ही सध्याची वाढ पाहता, पुढील आर्थिक वर्षांसाठी (२०२३-२४) अर्थसंकल्पातील उद्दिष्टातही लक्षणीय वाढ केली जाण्याची शक्यता आहे, असे गुप्ता यांनी स्पष्ट केले.