चार महिन्यांमध्ये ऊर्जा क्षेत्रातील सलग दुसरा खरेदी व्यवहार पार पाडत अदानी पॉवर कंपनी ही देशातील सर्वात मोठी खासगी ऊर्जानिर्मिती कंपनी बनली आहे. कंपनीने अवांता समुहाचा ६०० मेगावॅट निर्मिती क्षमतेचा ऊर्जा प्रकल्प ४,२०० कोटी रुपयांना खरेदी केला आहे.
पश्चिम कोब्रा भागातील हा ऊर्जा प्रकल्प कोळशावर आधारित आहे. नव्या व्यवहार खरेदीमुळे अदानी पॉवर आता ११,०४० मेगावॅट ऊर्जा निर्मिती क्षमता असणारी सर्वात मोठी झाली आहे. यंदाच्या ऑगस्टमध्येच अदानी पॉवरने उडिपी येथील १,२०० मेगा वॅटचा ऊर्जा प्रकल्प खरेदी केला होता. कोटय़वधींचे कर्ज असलेल्या लॅन्को इन्फ्राचा हा प्रकल्प त्यावेळी ६,००० कोटी रुपयांना खरेदी करण्यात आला होता.
अदानी समूहाने २०२० पर्यंत २०,००० मेगा वॅट ऊर्जा निर्मिती क्षमतेचे उद्दिष्ट यापूर्वीच स्पष्ट केले आहे. अवांताच्या कोब्रास्थित प्रकल्प खरेदीमुळे अदानी पॉवरला कोळसा खनिकर्म क्षेत्रात आपला ठसा उमटविण्याची संधी मिळाली आहे. कोळसा खाणींसाठी फेब्रुवारी २०१५ मध्ये होणाऱ्या लिलावानंतर या प्रकल्पाचा लाभ प्रत्यक्षात दिसू लागेल.
अदानी पॉवरच्या अस्तित्वातील सध्याच्या ऊर्जा निर्मिती प्रकल्पांची क्षमता ९,२४० मेगावॅट आहे. पैकी सर्वाधिक ऊर्जा निर्मिती क्षमता प्रकल्प हा गुजरातेतील मुंद्रा येथे आहे, तर महाराष्ट्रातील तिरोडा येथील ३,३०० मेगावॅट ऊर्जा निर्मिती प्रकल्पासह येथेच आणखी ६६० मेगा वॅट ऊर्जा निर्मिती प्रतीक्षेत आहे. याशिवाय कंपनीचा राजस्थानमध्येही एक ऊर्जा निर्मिती प्रकल्प आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

समूह राजकीय संबंधाच्या गर्तेत
अदानी समूह गेल्या अनेक महिन्यांपासून राजकीय हितसंबंधाच्याही आरोपातही गुरफटलेली आहे. मेमधील सार्वत्रिक निवडणुकीत आपचे केजरीवाल यांनी अदानी-भाजप संबंधांवर टीका केली होती, तर देशातील सर्वात मोठय़ा सार्वजनिक स्टेट बँकेने अदानी समूहाला एक अब्ज डॉलरचे कर्ज दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार नवे लक्ष्य ठरले आहे.
गौतम-गौतम..
अवांता समूह हा गौतम थापर प्रवर्तित बहुआयामी क्षेत्रातील उद्योग समूह असून अदानी समूहाचेही सर्वेसर्वा गौतम याच नावाची व्यक्ती आहे. गेल्याच आठवडय़ात असाच संयोग बँक क्षेत्रात जुळून आला होता. आयएनजी वैश्य ताब्यात घेणाऱ्या कोटक महिंद्र बँकेचेही मुख्य शिलेदार अनुक्रमे उदय सरिन (मुख्य कार्यकारी अधिकारी) व उदय कोटक (कार्यकारी उपाध्यक्ष) हे होते.

ऊर्जा क्षेत्रातील विस्तारित संधीचा लाभ घेण्याची हीच योग्य वेळ आहे. नव्या व्यवहारामुळे कंपनीचे देशव्यापी अस्तित्वही निर्माण होईल. या क्षेत्रात येऊ घातलेल्या सुधारणांच्या पाश्र्वभूमीवर हा व्यवहार आमच्यासाठी खूपच महत्त्वाचा ठरत आहे.
गौतम अदानी, अध्यक्ष, अदानी समूह.

समभाग मूल्यात ऊर्जा
अवांता समूहाचा ऊर्जा प्रकल्प खरेदीमुळे अदानी पॉवरचा समभाग सोमवारी भांडवली बाजारात ३ टक्क्य़ांपर्यंत वधारला. मुंबई शेअर बाजारात कंपनीच्या समभागाला व्यवहारात ३.४१ टक्के अधिक, ४६.९० रुपयेपर्यंतचा भाव मिळाला, तर दिवसअखेर तो शुक्रवारच्या तुलनेत २.६५ टक्क्य़ांनी उंचावत ४६.५५ रुपयांवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजारातही कंपनी समभाग मूल्य २.४२ टक्क्य़ांनी वधारून ४६.५५ पर्यंत झेपावले.

अदानी पॉवरची विद्यमान ऊर्जा निर्मिती क्षमता
मुंद्रा (गुजरात)          ४,६२० मेगावॅट
तिरोडा (महाराष्ट्र)      ३,३०० मेगावॅट
कवाई (राजस्थान)    १,३२० मेगावॅट
एकूण                        ९,२४० मेगावॅट

सरकारची पावले योग्य दिशेने; ‘नोमुरा’ची पावती
मुंबई : ऊर्जा क्षेत्राबाबत केंद्र सरकारद्वारे घेतले जाणारे निर्णय योग्य असून या क्षेत्राच्या सुधारणांसाठी सरकारची पावले योग्य दिशेने पडत असल्याची पावती नोमुरा या वित्तसंस्थे ने दिली आहे. गेल्याच आठवडय़ात ऊर्जा क्षेत्रातील तीन प्रकल्पांना केंद्र सरकारने दिलेल्या मंजुरीच्या पाश्र्वभूमीवर हे मत व्यक्त करताना नोमुराने यामुळे निर्मिती क्षेत्राला नियमित विद्युतपुरवठा होऊन विकासात भर घातली जाईल, असेही म्हटले आहे. देशाला सद्यस्थितीत जाणवणाऱ्या विद्युत टंचाईसारख्या संकटातून याद्वारे मार्ग निघेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.
जिंदालकडून प्रकल्प बासनात
नवी दिल्ली : जिंदाल स्टील अ‍ॅण्ड पॉवरने त्याचा ओडिशातील नियोजित ऊर्जा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. १० अब्ज डॉलरचा हा प्रकल्प कोळशावर आधारित होता. सर्वोच्च न्यायालयाने रामचंडी खाण रद्द करण्याच्या निर्णयामुळे संभाव्य प्रभाव होणारा अंगुल हा प्रकल्प होणार नाही. कोळसा खाण रद्द झाल्याने आता एक चांगला प्रकल्पही होणार नाही, असे याबाबत कंपनीचे अध्यक्ष नवीनजिंदाल यांनी म्हटले आहे. १५० कोटी टन राखीव खनिज संपत्ती असलेला रामचंडी कोळसा खाण कंपनीला २००७ मध्ये दिली होती.

More Stories onपॉवरPower
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adani power becomes india largest private power producer
First published on: 25-11-2014 at 01:02 IST