ब्रिटिश औषधी कंपनी अ‍ॅस्ट्राझेन्कावर फायझर इन्क या अमेरिकी कंपनीमार्फत संपादनाच्या प्रयत्नांना सोमवारी सुरुंग लागला. या ताबा व्यवहारासाठी फायझरने उंचावून पुढे केलेली ११७ अब्ज डॉलरची अंतिम बोलीही अ‍ॅस्ट्राझेन्काने फेटाळून लावली. फायझरकडून कंपनीचे मूल्यांकन कमी केले गेले असल्याचे तिने कारण पुढे केले.
लिपिटॉर आणि व्हायग्रा यांसारखी धमाकेदार लोकप्रिय औषधांच्या निर्माता असलेल्या फायझरने गेल्या शुक्रवारी अ‍ॅस्ट्राझेन्काच्या संपादनासाठी प्रति समभाग ५५ पौंड या दराने मूल्यांकन करणारी अंतिम बोली सादर केली. ही किंमत या आधी म्हणजे २ मे रोजी सादर केलेल्या बोलीपेक्षा १५ टक्क्यांनी उंचावण्यात आली होती. तथापि त्या संबंधाने अ‍ॅस्ट्राझेन्काच्या संचालक मंडळाने नकारार्थी प्रतिक्रिया व्यक्त करीत ती पूर्णत: फेटाळून लावली.
ही अंतिम बोली खूपच अपुरी आणि कंपनीच्या विद्यमान भागधारकांच्या दृष्टीने जोखमेची ठरेलच शिवाय आपले कर्मचारी, कंपनी आणि एकंदर ब्रिटन, स्वीडन आणि अमेरिकेच्या जीव-विज्ञान क्षेत्रावरही विपरीत परिणाम करणारी ठरेल, असे अ‍ॅस्ट्राझेन्काचे अध्यक्ष लैफ जोहान्सन यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले.