भूषण महाजन

करोनाची दुसरी लाट, नंतर आलेला ओमायक्रॉन संसर्ग, या साऱ्यांना धीरोदात्तपणे तोंड देत निफ्टीने सरत्या वर्षांत चक्क २४ टक्के परतावा दिला. जत्रेत आलेले मूल जसे आकाश पाळण्याकडे आसुसून बघत असते , तसेच आयुष्यभर एफडी किंवा विम्याव्यतिरिक्त काही गुंतवणूक न केलेला गुंतवणूकदार म्युचुअल फंडाकडे उत्सुकतेने बघत आत येण्याचा विचार करत असतो. ‘मलाही शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचे बक्षीस म्हणून किमान वीस टक्के परतावा मिळायला पाहिजे पण तोटा मात्र अजिबात नको’ असेच या नवगुंतवणूकदाराला वाटत असते. नशिबाने कधीमधी चुकून जरी हे जमले तरी हे सतत होणे अशक्य आहे, हे प्रथम समजून घेतले पाहिजे. आपल्या अपेक्षा जर एफडीपेक्षा थोडा अधिक परतावा इतक्या रास्त ठेवल्या तर, उंबरठय़ावरील पहिलटकरांसाठी एक उत्कृष्ट पर्याय म्हणजे बॅलन्स्ड अ‍ॅडव्हान्टेज फंड होय.   

बॅलन्स्ड अ‍ॅडव्हान्टेज फंड म्हणजे काय ?

रोज व्यायाम केला पाहिजे हे सगळय़ांना माहीत असते पण करणारे थोडे असतात, तसेच बाजार वर गेला की नफा खिशात टाकला पाहिजे हे साऱ्यांना समजते पण तो अजून वर जाईल या आशेमुळे विक्री होत नाही. तीच गत बाजार खाली आल्यावर होते. अशा वेळी आपल्या वतीने कुणी जर शेअर बाजार वर गेल्यावर विक्री केली आणि तो खाली आल्यावर खरेदी केली तर काय बहार येईल? हेच काम बॅलन्स्ड अ‍ॅडव्हान्टेज फंड करतो. यात शेअर बाजार व रोखे बाजार (मुदत कर्जे व आर्बिट्राज) दोन्हीत गुंतवणूक केली जाते. बाजार खाली आल्यास शेअर बाजारातील गुंतवणूक वाढवल्या जाते, तर वर गेल्यास विक्री करून ती रक्कम रोख्यात गुंतवली जाते. यामुळे दोन्ही मालमत्तेतील गुंतवणुकीचा समतोल साधला जातो.

हे करताना वेगवेगळे प्रतिमान (मॉडेल्स) फंड व्यवस्थापक आखतात. त्यातही सर्वसाधारणपणे शेअर बाजार किती महाग झाला आहे हे कळण्यासाठी पी/ई गुणोत्तराचा निकष वापरला जातो व ते निर्देशांकासाठी २६ ते २८ असल्यास बाजार महाग असे समजले जाते. बिर्ला, आयडीएफसी आदी फंड हे प्रतिमान वापरतात, पण कित्येकदा बाजार अधिकाधिक महाग होत जातो. त्यामुळे चुकीच्या वेळी विक्री होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी आयसीआयसीआय प्रु. सारखे काही फंड पी/बी (प्राईस टू बुक) बाजारभाव/पुस्तकी किंमत हे मॉडेल वापरतात. यात भूतकाळातील नफा पुस्तकी किंमतीत समाविष्ट होत असल्यामुळे, खरेदी विक्रीचे निर्णय अधिक सूक्ष्मपणे घेता येतात.  एडेल्वाईस व अ‍ॅक्सिससारखे काही फंड व्यवस्थापक त्याबरोबर बाजाराचा कल व गतीवेग देखील बघतात. प्रत्येकच नवा फंड ‘उसकी कमीज मेरे कमीजसे जादा सफेद कैसे?’ असे म्हणत त्यात नवनवी सुधारणा करीत असतो. त्यात मागील वर्षांचा पी/ई  व येणाऱ्या वर्षांच्या पी/ई च्या अंदाजाची सरासरी, असेही एक प्रतिमान आहे. टाटा म्युचुअल फंड हे मॉडेल वापरतो. महापूर आल्यावर पुण्याची मुठानदी देखील स्वच्छ वाटायला लागते, तसेच नुकत्याच आलेल्या तेजीमुळे सर्वच फंडांचा परतावा गोजिरवाणा दिसतो. तरी त्यातून किमान दोन टक्के वजा करावेत.

विशेष लक्षात ठेवावयाच्या बाबी :

१. बॅलन्स्ड अ‍ॅडव्हान्टेज फंडात गुंतवणूक करताना किमान तीन ते पाच वर्षांचे धोरण आखणे आवश्यक आहे. कारण तेजी-मंदीचे एक आवर्तन पूर्ण व्हायला हवे.

२. दोन वेगवेगळय़ा शैलीच्या फंडात गुंतवणूक करणे अधिक व्यवहार्य. उदा. एडेलवाईस व आयसीआयसीआय प्रु., किंवा टाटा व निपॉन, किंवा कोटक आणि पीजीआयएम वगैरे

३. निवृत्तिपश्चात पेन्शन नियोजनासाठीही हे फंड उपयुक्त आहेत. मात्र तशी योजना आखताना प्रथम किमान एक वर्ष थांबून दुसऱ्या वर्षी ‘एसटीपी’ पद्धतीने दरमहा काही रक्कम गुंतवणूकदारांनी गाठीशी बांधणे अधिक सोयीचे आहे. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

४. सवलतीचा कर दर हा योजनेचा सर्वात मोठा फायदा असून, अल्पकालीन १५ टक्के व दीर्घकालीन नफ्यावर दहाच टक्के कर भार येतो.

गुंतवणूकदारांनी स्वत:ची जोखीमक्षमता व संयमक्षमता बघून, सल्लागाराला विचारून निर्णय घ्यावा.