कच्च्या तेलाच्या भडक्याचे पडसाद, सेन्सेक्समध्ये २७५ अंशांची घसरण

इराकमधील युद्धस्थितीचे सावट बुधवारी भांडवली बाजारावर अधिक गडद झाले. कच्चा तेलाच्या दरातील वाढीने मुंबईचा शेअर बाजारही चिंता व्यक्त करता झाला.

इराकमधील युद्धस्थितीचे सावट बुधवारी भांडवली बाजारावर अधिक गडद झाले. कच्चा तेलाच्या दरातील वाढीने मुंबईचा शेअर बाजारही चिंता व्यक्त करता झाला. व्यवहारात ४०० अंशपर्यंत आपटणारा सेन्सेक्स दिवसअखेर मंगळवारच्या तुलनेत २७४.९४ अंश घसरणीसह थेट २५,२४६.२५ पर्यंत येऊन ठेपला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ७३.५० अंश घसरणीसह ७,६०० च्या आत, ७,५५८.२० वर स्थिरावला.
इराकस्थितीपोटी व्यवहारात चिंता व्यक्त करणाऱ्या मुंबई शेअर बाजारात मंगळवारी अगदी अखेरच्या तासाभरात झालेल्या खरेदीने सेन्सेक्सने ३३१ अंश भर राखली होती. सलग दोन दिवसातील जवळपास ५०० अंश वाढीनंतर बुधवारी मात्र दिवसभर घसरणीचेच चित्र राहिले. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे प्रतिपिंप १२० डॉलरच्या दरम्यान व्यवहार होताना पाहून गुंतवणूकदारांनी स्थानिक तेल कंपन्यांच्या समभागांसह अन्यचाही विक्रीचा मारा ठेवला. परिणामी व्यवहारातच ४०० अंशपर्यंत पडझड बाजारात अनुभवली गेली. दिवसअखेर बाजार सावरला असला तरी घसरणीतून तो सावरू शकला नाही.
तेल दराचा एकूणच देशांतर्गत महागाईवर होणाऱ्या परिणामाबद्दल चिंता व्यक्त करत गुंतवणूकदारांनी सेन्सेक्सला २५,११४.३० या दिवसाच्या नीचांकांवर आणून ठेवले. या घसरणीमुळे निफ्टीदेखील त्याची ७,६०० ची पातळी सोडत बुधवारअखेर ७,५५० च्या उंबरठय़ावर येऊन थांबला.
१२ पैकी ११ क्षेत्रीय निर्देशांक नकारात्मक स्थितीत नोंदले गेले, तर सेन्सेक्समधील २३ समभाग घसरणीच्या यादीत राहिले. ४० वी वार्षिक सर्वसाधारण सभा होणार असल्याच्या दिवशीच रिलायन्सचा समभाग २ टक्क्यांहून अधिक आपटला. सार्वजनिक तेल विपणन कंपन्यांच्या समभाग मूल्यांनीही लोळण घेतली. भेल, स्टेट बँक, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, कोल इंडिया, एचडीएफसी बँक, टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेस या सेन्सेक्समधील आघाडीच्या समभागांनीही घसरणीत सहभाग घेतला.
अस्वस्थता सर्वच बाजारात तेल : प्रति पिंप १२० डॉलपर्यंत
इराकमधील सर्वात मोठय़ा तेल शुद्धीकरण कंपनीवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचे पडसाद आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या दरावर बुधवारी त्याच तीव्रतेने उमटले. व्यवहारात कच्चे तेल प्रति पिंप १२० डॉलपर्यंत गेले. ब्रेन्ट क्रूडचा भाव दिवसअखेर ११३ पर्यंत उतरला असला तरी मंगळवारच्या तुलनेत त्यात पिंपामागे ११ ते १२ टक्क्यांची वाढ नोंदली गेली. अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हच्या बुधवारी रात्री उशिरा होणाऱ्या अर्थसहाय्य उपाययोजनांसंबंधीच्या बैठकीच्या पाश्र्वभूमीवर इंधन दरात मोठी हालचाल नोंदली गेली नाही, अशी चर्चा होती. मात्र इराकमधील स्थिती अधिक गंभीर बनल्यास हे दर आणखी भडकण्याची शक्यता आहे.
रुपया: ३६ पैशांनी रोडावला!
आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाची अस्वस्थता बुधवारी परकी चलन व्यवहारावरही उमटली. एकाच व्यवहारात तब्बल ३६ पैशांनी रोडावत रुपया डॉलरच्या तुलनेत ६०.३९ पर्यंत घसरला. त्याचा हा गेल्या सात आठवडय़ांचा नीचांक होता. गेल्या व्यवहारातील १३ पैसे घसरणीनंतर चलन बुधवारच्या सुरुवातीच्या सत्रात ६०.२८ या किमान पातळीवरच रुजू झाले. व्यवहारात ६०.०६ चा दिवसाचा उच्चांक गाठल्यानंतर चलन ६०.५४ पर्यंत रसातळाला गेले. दिवसअखेरचे त्याचे ०.६० टक्के नुकसान रुपयाला २९ एप्रिलच्या ६०.४२ समकक्ष घेऊन गेले.
सोने-चांदी: तेजीची चमक
कच्चे तेल, चलन, भांडवली बाजारातील अस्वस्थतेने सराफा बाजाराला मात्र चमकवून टाकले. सोने-चांदीच्या दरात बुधवारी कमालीची वाढ पाहायला मिळाली. तोळ्यामागे सोने जवळपास २०० रुपयांनी उंचावले असले तरी ते आता २७,५०० रुपयांच्या पुढे प्रवास करत आहे. तर चांदीच्या दराने बुधवारी किलोची ४३ हजार रुपयांची पातळीही ओलांडली. किलोमागे मंगळवारच्या तुलनेत पांढरा धातू एकदम ५१० रुपयांची वाढ नोंदवीत ४३,२९५ रुपयांवर गेला.

तेल कंपन्यांच्या समभागांना गळती
मुंबई: इराकमधील युद्धस्थितीमुळे भांडवली बाजारातील तेलाशी संबंधित कंपन्यांच्या समभागांमध्ये कमालीचा उतार बुधवारी पाहायला मिळाला. अर्थात यात आघाडी घेतली ती सार्वजनिक तेल व वायू विपणन तसेच विक्री कंपन्यांनी. हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, इंडियन ऑईलसारख्या कंपन्यांचे समभाग दिवसअखेर ४.६ टक्क्यांपर्यंत घसरले, तर वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने मोठी गुंतवणूक आणि विस्तार कार्यक्रम जाहीर करूनही रिलायन्सचा समभाग नफेखोरीपोटी २.५ टक्क्यांपर्यंत आपटला. इराकमधील यादवी पटलावर आली तेव्हा म्हणजे सरलेल्या शुक्रवारी बीपीसीएल, एचपीसीएल, इंडियन ऑइल या सरकारी तेल कंपन्यांचे समभाग ८-९ टक्क्य़ांनी घसरले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bse sensex falls 275 points as worsening iraq unrest pushes oil higher

ताज्या बातम्या