आघाडीच्या समभागांची विक्री होत राहिल्याने सेन्सेक्स बुधवारी सप्ताहाच्या नीचांकाला आला. अमेरिकेच्या रोजगार आकडेवारीने निराश झालेल्या जागतिक शेअर बाजारांना साथ देत मुंबई निर्देशांक जवळपास शतकी घसरण नोंदविता झाला. ९७.०९ अंश घसरणीसह सेन्सेक्स २०,७६७.८८ वर आला, तर निफ्टी २४.४५ अंश आपटीसह ६,२०० च्या खाली येत ६,१७८.३५ पर्यंत घसरला. परकी चलन व सराफा बाजारात मात्र तेजी नोंदली गेली.
मंगळवारच्या व्यवहारात २९ अंशांची घसरण नोंदवीत मुंबई शेअर बाजाराने सलग तीन सत्रांनंतर प्रथमच घट राखली. बुधवारी २०,९२२.३२ अशा तेजीसह व्यवहाराची सुरुवात करणारा सेन्सेक्स दिवसअखेर घसरला. या वेळी त्याने १७ ऑक्टोबरच्या २०,४१५.५१ या टप्प्यानजीक राहणे पसंत केले. ६,२०० च्या वर असलेला निफ्टी बुधवारी घसरणीनंतर या पातळीखाली आला. घसरणीच्या दफ्तरी माहिती तंत्रज्ञान व वाहन कंपन्यांची नोंद झाली.
दरम्यान, सलग तीन व्यवहारांतील घसरण मोडीत काढत रुपया बुधवारी ६ पैशांनी उंचावला. डॉलरच्या तुलनेत त्याचे मूल्य ६१.५९ वर राहिले, तर सराफा बाजारातील चमक अधिक राहिली. सोने तोळ्यामागे एकदम ४१० रुपयांनी वाढून १० ग्रॅमसाठी ३१,७४० या ३२ हजाराच्या नजीक पोहोचले, तर किलोमागे ९१० रुपयांची वाढ नोंदवीत चांदीच्या दराने ५० हजारांचा पल्ला गाठला. पांढऱ्या धातूला बुधवारी एक किलोसाठी ५०,५४० रुपयांचा भाव मिळाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bse sensex hits 1 week low
First published on: 24-10-2013 at 12:56 IST