मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढमधील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या घवघवीत यशाची सकारात्मक प्रतिक्रिया सोमवारी मुंबई शेअर बाजारात उमटली. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी मुंबई शेअर बाजार सुरू होताच निर्देशांक विक्रमी पातळीवर पोहोचला. निर्देशांकामध्ये सकाळच्या सत्रात २.३ टक्क्यांनी वाढ होऊन तो २१,४८३.७४ पर्यंत पोहोचला.
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढमध्ये भाजपने बहुमत मिळवले आहे. यापैकी छत्तीसगढ आणि मध्य प्रदेशात भाजपचीच सत्ता होती. राजस्थानमध्ये पक्षाने कॉंग्रेसकडून सत्ता खेचून घेतली. दिल्लीमध्येही भाजप सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयाला आला. एक्झिट पोल्समध्येही या सर्व ठिकाणी भाजपचीच सत्ता येईल, असे भाकीत वर्तविण्यात आले होते. ते खरे ठरले आहे. चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालांवरून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे त्यांचा खरेदी करण्याकडे कल राहिला. याचा परिणाम निर्देशांक वाढण्यात झाला.
मुंबई शेअर बाजाराप्रमाणे निफ्टीमध्ये सोमवारी सकाळी २.५ टक्क्यांनी वाढ झाली. तिथेही गुंतवणूकदारांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालांचे स्वागत केल्याचे चित्र होते.