मुंबई : भांडवली बाजारात सप्ताहअखेरच्या दिवशी मोठय़ा अस्थिरतेच्या वातावरणातही प्रमुख निर्देशांक सकारात्मक पातळीवर बंद झाले. निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या खासगी क्षेत्रातील अ‍ॅक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँकेच्या समभागात गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केल्याने सेन्सेक्स १०४ अंशांनी वधारला. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी पुन्हा देशांतर्गत बाजाराकडे मोर्चा वळवल्याने निर्देशांकाला अधिक बळ मिळाले. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १०४.२५ अंशांची वधारून ५९,३०७.१५ पातळीवर बंद झाला. दिवसभरात त्याने ३८८.०३ झेप घेत ५९,५९०.९३ या सत्रातील उच्चांकी पातळीपर्यंत मजल मारली. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १२.३५ अंशांची वाढ झाली आणि तो १७,५७६.३० पातळीवर स्थिरावला.

युरोपात मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक व्याज दरवाढ केली जाण्याच्या भीतीने दुपारच्या सत्रात जागतिक बाजारात गुंतवणूकदारांमध्ये निराशेचे वातावरण पसरले. त्याचेच पडसाद देशांतर्गत भांडवली बाजारावर उमटले. देशांतर्गत पातळीवर देखील गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेत नफावसुलीला प्राधान्य दिले. बँक, माहिती तंत्रज्ञान आणि ग्राहकोपयोगी वस्तू कंपन्यांच्या सरलेल्या तिमाहीतील चांगल्या कामगिरीमुळे गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे आणि त्या परिणामी बाजारात तेजीचे वातावरण कायम आहे. मात्र दुसरीकडे व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणारे मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांच्या समभागात मोठी घसरण झाली, असे निरीक्षण जिओजित फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले. 

सोमवारी मुहूर्ताचे सौदे 

भांडवली बाजारातील परंपरेप्रमाणे लक्ष्मीपूजननिमित्त सोमवारी संध्याकाळी बाजारात मुहूर्ताचे सौदे पार पडणार आहेत. राष्ट्रीय तसेच मुंबई शेअर बाजारात मुहूर्ताचे हे विशेष सौदे संध्याकाळी ६.१५ ते ७.१५ या तासाभरादरम्यान पार पडतील. हिंदू नववर्ष अर्थात विक्रम संवत २०७९ चे स्वागत या निमित्ताने बाजाराकडून केले जाईल. भारतीय संस्कृतीमध्ये कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात किंवा नवीन वस्तूची खरेदी शुभमुहूर्तावर करण्याची प्रथा आहे. ते काम यशस्वी होईल, अशी त्या मागची संकल्पना आहे. शेअर बाजारमध्ये गुंतवणूकदेखील याच मुहूर्तावर गुंतवणूक करून येणाऱ्या वर्षांमध्ये भरपूर नफा मिळेल, अशी पूर्वापार धारणा आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bulls momentum continues sensex gains 104 degrees volatility atmosphere ysh
First published on: 22-10-2022 at 00:02 IST