घडय़ाळांविषयी चार दिवसांचे  ‘समय भारती’ प्रदर्शन गुरुवारपासून
मुंबई: दरसाल पावणेपाच कोटी मनगटी घडय़ाळांची विक्री होणाऱ्या तब्बल १० हजार कोटींच्या भारताच्या घडय़ाळ बाजारपेठेने उत्तरोत्तर केवळ स्विस घडय़ाळेच नव्हे, तर जपान, फ्रान्स, बेल्जियम, अमेरिका, कोरिया, डेन्मार्क, चीन, हाँगकाँग, इटली, स्पेनमधील घडय़ाळांच्या ब्रॅण्ड्सनाही आकर्षित केले आहे. शिवाय मेड इन इंडिया ब्रॅण्ड्समध्ये अधिकाधिक नावीन्यता आणि तंत्रज्ञानात्मक सुधार येत असून, अशा तब्बल १०० ब्रॅण्ड्सची मांदियाळी यंदाच्या १७ व्या ‘समय भारती २०१४’ या घडय़ाळांच्या जंगी प्रदर्शनात दिसून येईल. यंदा हे प्रदर्शन गुरुवार १ मे ते रविवार ४ मे असे चार दिवस, नेहरू सेंटर, वरळी येथे सुरू राहणार आहे. सर्वसामान्यांसाठी दुपारी ३ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत प्रदर्शनासाठी प्रवेश खुला असेल. वाणिज्य प्रतिनिधी आणि सामान्य प्रेक्षक असे मिळून चार दिवसांत ४० हजारांहून अधिक लोक प्रदर्शनाला भेट देतील, असा प्रदर्शनाचे आयोजक ट्रेड पोस्टचा दावा आहे.  

ग्राहकोपयोगी वस्तू खरेदी ग्राहकांमध्ये   
३५%बाजारहिश्शाचे बजाज फायनान्सचे लक्ष्य
पुणे: बजाज फिनसव्‍‌र्ह समूहाचे एक अंग असलेल्या बजाज फायनान्स लिमिटेडने टीव्ही, फ्रीज, वातानुकूलित यंत्रे, संगणक संच, लॅपटॉप वगैरे ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी अर्थसाहाय्यात आपले अग्रस्थान टिकवून ठेवण्याचा प्रयत्न म्हणून ‘ग्रेट इंडियन समर’ची घोषणा केली आहे. देशातील ११५ शहरांमध्ये १५ जून २०१४ पर्यंत सुरू राहणाऱ्या या विशेष उपक्रमात, ७,००० रुपये व त्यापेक्षा अधिक किमतीच्या कन्झ्युमर डय़ुरेबल वस्तू व्याजरहित सुलभ हप्त्याच्या कर्जसाहाय्यातून खरेदी करण्याची मुभा ग्राहकांना मिळणार आहे. शिवाय अशा प्रत्येक ग्राहकाला हमखास आकर्षक बक्षिसे जिंकण्याचीही संधी मिळेल. सध्या या बाजारपेठेत १५ टक्के अग्रस्थानी असलेल्या बजाज फायनान्सला या नव्या उन्हाळी उपक्रमातून हा हिस्सा ३५ टक्क्यांवर जाणे अपेक्षित आहे. या उपक्रमात सहभागी ग्राहकांना आयपॅड मिनी, आयपॉड्स, किंडल फायर, सोनी पीएस ४ अशी बक्षिसे जिंकता येतील. तर एका ग्राहकाला दोघांसाठी युरोपच्या सहलीचे भव्य बक्षीस जिंकता येईल.