scorecardresearch

सेन्सेक्स पंधरवडय़ानंतर तर निफ्टी आठवडय़ाने सर्वोच्च स्थानी

मोठय़ा तेजीसह नव्या सप्ताहाची सुरुवात करणाऱ्या भांडवली बाजाराने त्याचा पंधरवडय़ापूर्वीचा विक्रम मोडित काढला. आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी घसघशीत ३०० अंशांची झेप घेत सेन्सेक्स २२,०५५.४८ या सर्वोच्च पदावर विराजमान झाला.

मोठय़ा तेजीसह नव्या सप्ताहाची सुरुवात करणाऱ्या भांडवली बाजाराने त्याचा पंधरवडय़ापूर्वीचा विक्रम मोडित काढला. आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी घसघशीत ३०० अंशांची झेप घेत सेन्सेक्स २२,०५५.४८ या सर्वोच्च पदावर विराजमान झाला. त्याला राष्ट्रीय शेअर बाजाराने साथ दिल्याने या व्यासपीठावरील निफ्टीदेखील पुन्हा ६,५०० पुढील कामगिरी बजावली. देशातील सर्वात मोठा हा भांडवली बाजार ८८ अंश वाढीसह ६,५८३.५० वर गेला. दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी त्यांच्या व्यवहारात यापेक्षा वरचा स्तर पाहत मागच्या व्यवहारातील सर्वोच्च गवसणीलाही मागे टाकले. यारुपाने बाजारांनी गेल्या काही दिवसातील निराशा भरून काढली आहे.

महिन्याच्या मध्यात विक्रमी टप्पा पार करणाऱ्या भांडवली बाजाराचा गेला आठवडा, पंधरवडा तसा संथ गेला. सोमवारी मात्र बाजारांनी एकदम उसळी घेत पुन्हा एकदा नव्या विक्रमात हात घातला. २०१३-१४ आर्थिक वर्ष संपण्यास व्यावहारिकदृष्टय़ा अवघे पाचच दिवस राहिले असल्याने विद्यमान आर्थिक वर्षअखेर अर्थव्यवस्था रुळावर येण्याच्या गुंतवणूकदारांच्या समाधानाला भविष्याविषयीही आशा जागृत झाली. याच वातावरणात विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भर घातली. रिझव्‍‌र्ह बँक सव्वा महिन्यानंतरच्या पतधोरणात व्याजदर स्थिर ठेवण्याच्या अधिकच्या अटकळीनंतर त्यांचा ओघ वाढला. याचा परिणाम अर्थातच बँक समभागांवर उमटला. बँकांमध्ये आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, एचडीएफसी यांचे समभाग वधारले. एकूण बँक्सेक्स क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये सर्वाधिक २.७३ टक्क्य़ांनी वधारला होता. समभाग ४.२ टक्क्य़ांपर्यंत झेप घेते झाले.

जोडीला तेल व वायू, वाहन, ऊर्जा, भांडवली वस्तू या क्षेत्रीय निर्देशांकातील समभागांची खरेदी कामी आली. उलट औषधनिर्मिती, ग्राहकोपयोगी वस्तू, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी समभागांनी नफेखोरी अवलंबली. सोबतच रिलायन्स, आयटीसी, ओएनजीसी, हिंदुस्थान यूनिलिव्हर, एल अ‍ॅण्ड टी, गेल यांनाही मागणी राहिली. सेन्सेक्समधील २४ कंपनी वधारले. यामध्ये ४.८१ टक्क्य़ांसह गेल इंडिया आघाडीवर राहिला.
मुंबई निर्देशांकाने यापूर्वी १० मार्च रोजी २१,९३४.८३ हा सर्वोच्च बंद भाव नोंदविला आहे. तर १८ मार्च रोजी त्याचा व्यवहारातील वरचा टप्पा २२,०४०.७२ राहिला आहे. २० मार्चपर्यंतच्या महिन्यात विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी १७,००० कोटी रुपयांचे समभाग भांडवली बाजारातून खरेदी केले आहेत.
महिन्यात दुसऱ्यांदा सर्वोच्च टप्प्यावर पोहोचणाऱ्या मुंबई शेअर बाजारातील १५५ समभागांनी वर्षभरातील उच्चांक सोमवारी नोंदविला. यात एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँकसह टीव्हीएस मोटर्स, मारुती सुझुकी, व्होल्टास, झेन टेक होते.
व्यवहारात भांडवली बाजाराबरोबरच परकी चलन व्यवहारातील वधारत्या रुपयानेही अर्थव्यवस्थेत गुंतवणूकदारांनी रस दाखविला आहे.

लोकसभेच्या आगामी निवडणुकांमुळे विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची उत्साह वधारला आहे. बँक समभागांनीही उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. अंतरिम लाभांश जाहिर होण्यासाठीच्या बैठकीमुळे ओएनजीसीचा समभागही सोमवारी ४ टक्क्य़ांनी उंचावला.
 संजीव झारबडे, उपाध्यक्ष (प्रायव्हेट क्लाएन्ट ग्रुप रिसर्च)
कोटक सिक्युरिटीज.

२४ मार्च 
सेन्सेक्स २२,०५५.४८ (व्यवहारात सर्वोच्च : २२,०७४.३४) 
निफ्टी ६,५८३.५० (व्यवहारात सर्वोच्च : ६,५९१.५०)

यापूर्वीचा विक्रम :
बंदअखेर १० मार्चला : २१,९३४.८३
व्यवहारात १८ मार्चला २२,०४०.७२

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Compensation in indian share market

ताज्या बातम्या