गेल्या काही महिन्यांमध्ये जीवनावश्यक वस्तूंसह विविध सेवांमध्ये झालेल्या दरवाढीने त्रस्त झालेल्या सर्वच नागरिकांना जागतिक घडामोडींमुळे निर्माण होत असलेल्या अर्थझळांना सामोरे जावे लागत आहे. गुरुवारी हे चटके आणखी तीव्र झाले.

सिलिंडरच्या किमतीत आणखी वाढ होऊन पहिल्यांदाच ते हजार रुपयांवर गेले. महागाईच्या धसक्याने अमेरिकी भांडवली बाजारात मोठय़ा प्रमाणावर पडझड झाल्याचे पडसाद जगभरात उमटले. भारतीय भांडवली बाजारात गुंतवणूकदारांनी समभाग विक्रीचा सपाटा लावल्याने सेन्सेक्समध्ये १,४१६ अंशांची घसरण झाली. सलग दुसऱ्या दिवशी डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत होत ऐतिहासिक नीचांकी ७८ च्या वेशीजवळ पोहोचला.

घरगुती गॅसचा भडका..

घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत गुरुवारी ३.५० रुपयांनी वाढ करण्यात आली़ या महिन्यातील सिलिंडर दरवाढीची ही दुसरी वेळ असून, सिलिंडरची किंमत एक हजार पार झाली . याआधी २२ मार्च आणि ७ मे रोजी सिलिंडरच्या किमतीत प्रत्येकी ५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती़ नव्या दरवाढीमुळे मुंबईत सिलिंडर १,००२़ ५० रुपयांवर पोहोचला आह़े एप्रिल २०२१ पासून सिलिंडरच्या किमतीत १९३ रुपयांनी वाढ झाली आह़े

शेअर बाजाराची बिकटस्थिती..

सत्राच्या अखेरीस मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १,४१६.३० अंशांनी म्हणजेच २.६१ टक्क्यांनी घसरत ५२,७९२.२३ पातळीवर बंद झाला. गुरुवारच्या सत्रात सेन्सेक्सने ५२,६६९.५१ अंशांचा नीचांकी पातळीला स्पर्श केला होता. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ४३०.९० म्हणजेच २.६५ टक्क्यांची घसरण झाली आणि तो दिवसाचे व्यवहार थंडावले तेव्हा १५,८०९.४० पातळीवर स्थिरावला.

आर्थिक महामंदीच्या भीतीने..

अमेरिकी बाजारात बुधवारच्या सत्रात ४ टक्क्यांहून अधिक घसरण झाली.  आर्थिक महामंदीच्या वाढत्या भीतींमुळे परदेशी गुंतवणूकदारांकडून देशांतर्गत भांडवली बाजारातून निधीचे निर्गमन सुरू असल्याने प्रमुख निर्देशांकात अडीच टक्क्यांहून अधिक घसरण झाली.  गुरुवारच्या सत्रातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांनी ६.७१ लाख कोटी रुपयांची मत्ता गमावली.

आणखी खोल..

डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरण कायम असून सलग दुसऱ्या सत्रात रुपयाने नवीन नीचांक नोंदविला. गुरुवारी प्रति डॉलर रुपया आणखी १० पैशांनी घसरून इतिहासात प्रथमच रुपयाने ७७.७२ ही ऐतिहासिक नीचांकी पातळी गाठली.